सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ काळ्या रानकुत्र्याची नोंद, जवळपास ८८ वर्षांनी अशा प्राण्याचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:48 IST2025-06-24T15:47:08+5:302025-06-24T15:48:57+5:30
या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले

छाया- दिग्विजय पाटील
कऱ्हाड (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील जंगलात अत्यंत दुर्मीळ अशा काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद झाली असून, या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कऱ्हाड येथील पर्यटक दिग्विजय पाटील हे सफारीसाठी गेले असता त्यांना पूर्णतः काळ्या रंगाचा रानकुत्रा दिसून आला. त्यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली.
वनविभागाच्या अभिलेखानुसार, यापूर्वी १९३६ मध्ये तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे स्कॉट्समॅन आणि निसर्गशास्त्रज्ञ आर. सी. मॉरिस यांनी अशाच प्रकारच्या काळ्या रानकुत्र्याची नोंद केली होती. जवळपास ८८ वर्षांनी अशा दुर्मीळ प्राण्याचे दर्शन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाले आहे.
रानकुत्रा किंवा कोळशिंदा सामान्यतः तांबूस लालसर रंगाचा असतो. मात्र, मेलेनिस्टिक या जैविक स्थितीमुळे त्याच्या शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्य प्रमाण निर्माण होते, ज्यामुळे तो पूर्णतः काळा दिसतो. ही स्थिती सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यात आढळते आणि ती आनुवंशिक स्वरूपाची असते.
मेलेनिस्टिक म्हणजे शरीरात मेलेनिनचे प्रमाण जास्त असल्याने प्राणी काळसर दिसतो. यापूर्वी सह्याद्रीत काळा बिबट्याही नोंदवला गेला होता. आता काळा रानकुत्राही आढळल्याने प्रकल्पातील जैवविविधतेचे दुर्मीळ रूप समोर आले. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक.