Satara- Phaltan Doctor Death: ज्यांना अब्रू नाही त्यांची बेअब्रू कशी?, हा संशोधनाचा विषय - रामराजे नाईक-निंबाळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:41 IST2025-10-31T13:34:06+5:302025-10-31T13:41:58+5:30
अब्रूनुकसानप्रकरणी १०० कोटींची नोटीस देणार

Satara- Phaltan Doctor Death: ज्यांना अब्रू नाही त्यांची बेअब्रू कशी?, हा संशोधनाचा विषय - रामराजे नाईक-निंबाळकर
फलटण : ‘डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे १२०० वर्षांच्या फलटणच्या इतिहासाला काळिमा फासला गेला. हा कलंक पुसून कसा काढायचा? हा आपल्यापुढे प्रश्न आहे. मी कुणालाही अटक करा, असं म्हणलेलो नाही; पण ज्यांची मनं खातायत; त्यांना माहितीय याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. आजकाल कुणीही अब्रूनुकसानीची नोटीस द्यायला लागलं आहे. ज्यांना अब्रू नाही त्यांची बेअब्रू कशी झाली, हा संशोधनाचा विषय आहे,’असा सवाल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.
ते म्हणाले, ‘वय वाढलं तरी तुम्हाला किती बुद्धी आहे,’ हे साखरवाडीला माहिती आहे. साखरेचं एक पोतं त्यांनी चार व्यापाऱ्यांना विकलं. मला तोंड उघडायला लावू नका. कारखाना हा भोगायला नसतो; तो शेतकऱ्यांचे संसार फुलवायसाठी असतो. कारखाना आपल्याला चालवायला जमला नाही; हे एकदा तरी मान्य करा. खुर्चीत बसून नाही, तर सुरवडीत बसून तुम्हाला लोळवीन, माझ्या नादाला तुम्ही लागू नका. येत्या दोन दिवसांत अब्रूनुकसानप्रकरणी मी तुम्हाला १०० कोटींची नोटीस देणार.’
वाचा : हॉटेलचे डीव्हीआर जप्त, मग सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे?
पीडिता डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर विविध आरोप होत आहेत. यामागे रामराजे नाईक-निंबाळकर असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी गुरुवारी (दि. ३०) केला होता. त्या आरोपाचा समाचार घेताना साखरवाडी येथील एका जाहीर कार्यक्रमात रामराजे यांनी विरोधकांना इशारा दिला.
अडचणीतून साखर कारखाना काढला...
‘शरद पवारांनी मला सांगितलं होतं; यांच्या भानगडीत पडू नका; पण आपल्या तालुक्यातला माणूस आहे. बागायतदार यात अडकलेत म्हणून मी साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर काढला. २०० कोटींचा कारखाना मी ६९ कोटींला दिला, असा माझ्यावर आरोप करतात. मग ज्यांच्या घरात तुम्ही पाणी भरत आहात; त्या कारखानदारांना तुम्ही हा कारखाना घ्यायला सांगायचं होतं,’ अशी टीकाही रामराजे यांनी केली.
सगळे निंबाळकर सारखे नाहीत...
‘पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे नाईक-निंबाळकर ब्रँडचे नाव कमी झाले आहे. हा डाग पुसून टाकण्यासाठी ‘ती’चा हुतात्मा दिन आपल्याला साजरा करावा लागेल. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा पुतळा उभा करण्याची मागणीही आपण सरकारकडे करणार आहे. यातून सगळे नाईक-निंबाळकर सारखे नाहीत, असा संदेश बाहेर जाईल,’ अशा भावना रामराजे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
साखरवाडीतील एक आत्महत्या टळली : संजीवराजे
‘फलटणमधील डॉक्टर युवतीची आत्महत्या दुर्दैवी आहे. साखरवाडीचा कारखाना रामराजे यांनी वाचवला. त्यामुळे साखरवाडीतील एक आत्महत्या निश्चितपणे टळली,’ अशी बोचरी टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.