Satara-Local Body Election: रामराजे टेक्निकल आमदार, प्रॅक्टिकल नव्हेत; शिवरूपराजे खर्डेकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:56 IST2025-11-26T15:53:29+5:302025-11-26T15:56:44+5:30
'एकनाथ शिंदे यांना रामराजेंचा अनुभव लवकरच येईल'

Satara-Local Body Election: रामराजे टेक्निकल आमदार, प्रॅक्टिकल नव्हेत; शिवरूपराजे खर्डेकर यांची टीका
फलटण : ‘फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील आणि विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर. रामराजे हे टेक्निकल राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते प्रॅक्टिकल नाहीत. राष्ट्रवादीने लढवलेल्या निवडणुकांत जेव्हा सचिन पाटील उभा होते तेव्हा त्यांनी त्यांचा प्रचार केला नाही. फलटण पालिकेसाठी राष्ट्रवादीचे सात उमेदवार रिंगणात आहेत. दोन राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार रामराजे करत नाहीत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी केली.
फलटण येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले, ‘फलटणकरांना एकदा फसवू शकता. रामराजे पहिले घड्याळात, लोकसभेला आणि विधानसभेला तुतारीला मदत केली. ११ महिने घड्याळाच्या मीटिंगला येत होते. आणि आता नगराध्यपदासाठी त्यांनी शिंदेसेनेचे चिन्ह घेतले आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. युतीत आहेत. त्यांना रामराजेंचा अनुभव लवकरच येईल. ही लोक एका पक्षात राहत नाहीत.
नगराध्यपदासाठी त्यांनी तात्पुरते लर्निंग लायसन्स घेतले आहे. पर्मनंट लायसन्स त्याचं कोणत्याही पक्षात होत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला ते कोणता पक्ष आणि चिन्ह घेतील, याचा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे.