सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेचे पायथा वीजगृहही बंद, धरण भरण्यासाठी किती टीएमसी पाण्याची गरज..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:08 IST2025-09-18T16:07:50+5:302025-09-18T16:08:33+5:30

जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस झाला. पण..

Rainfall in Satara district Koyne Piatha power house also closed | सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेचे पायथा वीजगृहही बंद, धरण भरण्यासाठी किती टीएमसी पाण्याची गरज..वाचा

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेचे पायथा वीजगृहही बंद, धरण भरण्यासाठी किती टीएमसी पाण्याची गरज..वाचा

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगला पाऊस होत असला तरी पश्चिमेकडे जवळपास उघडीप आहे. २४ तासात नवजा येथे ४, तर कोयनेला २ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. धरणात १०४ टीएमसी साठा आहे. धरण भरण्यासाठी अजून सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे.

जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून पाऊस सुरूच आहे. मे महिन्यातही जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर जूनच्या मध्यानंतर मान्सूनच्या पावसाने धुवाॅधार सुरुवात केली. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस झाला. पण, या दोन महिन्यात सरासरीएवढे पर्जन्यमान झाले नाही. तरीही मे आणि जूनमधील पावसाने पश्चिम भागातील प्रमुख प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता. त्यामुळे चिंतेचे वातावरण नव्हते. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातही पूर्वीच दमदार पाऊस झाल्याने पाझर तलाव भरुन वाहात होते. यामुळे शेतीला पाणी कमी पडत नव्हते. आता सप्टेंबर महिना अर्ध्यावर संपला आहे. सध्या परतीचा पाऊस सुरू आहे.

पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालू लागला आहे. पण, सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे २, नवजा ४ आणि महाबळेश्वरला १ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे प्रमुख प्रकल्पात पाणी आवक कमी झाली आहे. कोयना धरणातही सकाळी १ हजार २२५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

धरणात १०३.९५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहाच्या एका युनिटमधून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू होता. त्यातच धरणात आवक कमी झाल्याने सकाळी नऊच्या सुमारास वीजगृहाचे युनिट बंद करून विसर्ग थांबविण्यात आला. त्यामुळे धरणातील विसर्ग पूर्णपणे थांबला आहे. आता धरण भरण्याचीच प्रतीक्षा आहे.

Web Title: Rainfall in Satara district Koyne Piatha power house also closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.