साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला
By नितीन काळेल | Updated: May 20, 2025 19:38 IST2025-05-20T19:37:44+5:302025-05-20T19:38:43+5:30
वाहतुकीस अडथळा : एकजण जखमी; शहरातील वीजपुरवठाही खंडित

साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला
सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून सातारा शहरात तर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस पडला. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. तर शहराजवळीलच यवतेश्वर घाटात वादळामुळे मोबाईल टाॅवर कोसळला. यामध्ये एकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.
एप्रिल महिना कडक उन्हाचा ठरला होता. पण, मे महिन्यात सतत वादळासह पाऊस होत आहे. यामुळे पारा एकदम कमी झाला आहे. त्यातच मागील काही दिवसांत सातारा शहराचे तापमान ३५ अंशाच्या खाली कायम आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता नाही. पण, काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. अशातच चार दिवसांपासून जिल्ह्यात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारीही सातारा शहरासह परिसरात पाऊस पडला.
सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास साताऱ्यात पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटात जवळपास २० मिनिटे पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. तसेच रस्त्याच्या बाजूची गटारेही भरून वाहत होती. मात्र, सखल भागात पाणी साचले. यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागली. त्यातच शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
दरम्यान, सायंकाळी सवा सहानंतरही पुन्हा पाऊस सुरू झाला. पण, यावेळी जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्यातच शहराजवळील यवतेश्वर घाटात मोबाइल टाॅवर रस्त्यावरच कोसळला. यामध्ये वाहनावरील एकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली. तसेच टाॅवर रस्त्यावरच पडल्याने वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. दोन्ही बाजुंनी वाहने थांबून होती.