- नितीन काळेल, सातारा सातारा शहरासह परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. तर सायंकाळी सातनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यात अनेक भागातही पावसाने हजेरी लावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस होत आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावत आहे. रविवारीही जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला.
सोमवारी सकाळपासूनच पाऊस होत होता. सातारा शहर आणि परिसरातही पहाटेपासून पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटात पाऊस पडला. सकाळी सात वाजेपर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर पावसाची उघडीप राहिली.
मात्र, दुपारच्या सुमारास पुन्हा आभाळ भरून आले होते. तसेच प्रचंड उकाडा जाणवत होता. पण, सायंकाळी सातनंतरच पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला जोरदार पाऊस पडला. पण, यावेळी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटच अधिक होता. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला.
याचदरम्यान वीजपुरवठाही खंडीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीज आली नव्हती. त्यामुळे सातारकरांना अंधारातच थांबावे लागले. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
माण तालुक्यात मुसळधार पाऊस...
माण तालुक्यातही दोन दिवसांपासून वळवाचा पाऊस होत आहे. रविवारी अनेक भागात पाऊस झाला. तर सोमवारीही काही गावांत मुसळधार पाऊस पडला. वडगाव, मार्डी, महिमानगडसह परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतही सायंकाळनंतर पाऊस झाला.