सांगलीच्या सुरक्षा रक्षक मंडळ अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी साताऱ्यात आंदोलन

By नितीन काळेल | Published: February 15, 2024 06:37 PM2024-02-15T18:37:28+5:302024-02-15T18:38:09+5:30

गैरकारभाराची चाैकशी करुन भरतीतील सत्य समोर आणा: जनता क्रांती दल आक्रमक

Protest in Satara for investigation of Sangli security guard board officer | सांगलीच्या सुरक्षा रक्षक मंडळ अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी साताऱ्यात आंदोलन

सांगलीच्या सुरक्षा रक्षक मंडळ अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी साताऱ्यात आंदोलन

सातारा : सांगली सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरतीत बेकायदेशीर कारभार करणारे सहायक कामगार आयुक्त आणि अध्यक्षांची खातेनिहाय चाैकशी करावी. तसेच २०१८ ते २१ दरम्यानच्या भरती प्रक्रियेतील पात्र सुरक्षा रक्षकांना तत्काळ नियुक्ती आदेश द्यावेत, अशी मागणी जनता क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१८ ते २१ दरम्यान सांगलीच्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून भरतीसाठी सम्मुचय पूल तयार करण्यात आला होता. भरती प्रक्रियेत सर्व अटी पूर्ण करणाऱ्या रक्षकाची निवड यादी तयार करुन प्रसिध्दही करण्यात आलेली. त्यावेळी थोड्याच कालावधीत मेरिटनुसार सर्वांना नियुक्ती आदेश देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता २०२४ पर्यंततरी उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही. मात्र, सांगली सुरक्षा रक्षक मंडळाचे सहायक कामगार आयुक्त आणि अध्यक्षांनी खासगी एजन्सीज आणि राजकीय नेते, लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणावर आऱ्थिक उलाढाल करुन मनमानीपणा केला आहे. 

तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक भरले आहेत. पण, २०१८ ते २१ च्या दरम्यानच्या परीक्षा ग्राऊंड आणि वैद्यकीय चाचणीतून पात्र ठरलेल्यांना जाणीवपूर्वक नियुक्ती आदेशापासून वंचित ठेवण्याचे पाप करुन अन्याय केलेला आहे. २०१८ पासून पात्र सुरक्षा रक्षक आपली नियुक्ती आज, उद्या होईल या अपेक्षेने जगत आहेत. यामुळे आता सांगली सहायक कामगार आयुक्त आणि अध्यक्ष तसेच सुरक्षा रक्षक मंडळाच्या गैरकारभाराची चाैकशी करुन भरतीतील सत्य समोर आणावे, अशी आमची मागणी आहे.

या आंदोलनात संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विकास सकट, सातारा जिल्हाध्यक्ष रोहिणी लोहार, दत्ता केंगार, अक्षय भिसे, नितीन वायदंडे, विशाल सपकाळ, विजय सोनवले, विशाल वायदंडे आदी सहभागी झाले आहेत.

Web Title: Protest in Satara for investigation of Sangli security guard board officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.