साताऱ्यात रिल्स स्टार तरुणीकडून वेश्या व्यवसाय, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:40 IST2024-12-10T13:39:49+5:302024-12-10T13:40:23+5:30

सातारा : सोशल मीडियावरील तथाकथित रिल्स स्टार असलेल्या एका तरुणीने तीन तरुणांच्या मदतीने सुरू केलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांनी ...

Prostitution business by young reel star in Satara, three arrested | साताऱ्यात रिल्स स्टार तरुणीकडून वेश्या व्यवसाय, तिघांना अटक

संग्रहित छाया

सातारा : सोशल मीडियावरील तथाकथित रिल्स स्टार असलेल्या एका तरुणीने तीन तरुणांच्या मदतीने सुरू केलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, सातारा तालुका पोलिस ठाण्यात तीन तरुणांसह एका रिल्स स्टार तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ७) रात्री साडेदहा वाजता खिंडवाडी-सोनगाव रस्त्यावर करण्यात आली.

गणेश मनोहर भोसले (२६, रा. कोरेगाव), ईश्वर सुभाष जाधव (३०, रा. विलासपूर, सातारा), वीरेंद्र महेंद्र जाधव (२१, रा. सदर बझार, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, तर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका रिल्स स्टार तरुणीचा समावेश आहे.

रिल्स स्टार असलेली एक तरुणी तीन तरुणांच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करत होती. तसेच सोशल मीडियावर असलेल्या फाॅलोअर्सचा उपयोग हा वेश्या व्यवसायासाठी करून गिऱ्हाईक मिळवून त्यांना मुली पुरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून कारवाईसाठी पाठविले. त्यावेळी वरील तिघांना पोलिसांनी अटक केली, तर संबंधित रिल्स स्टार महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली.

संबंधित रिल्स स्टार तरुणीने तसेच तिघा तरुणांनी आपापसात संगनमत करून दोन तरुणींकडून वेश्या व्यवसायाचा मोबदला स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वीकारला. तसेच वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून पीडित तरुणींना वेश्या व्यवसायासाठी त्यांनी प्रेरणा दिली. या सर्व संशयितांकडून पोलिसांनी १३ हजार ५०० रुपयांची रोकड, दोन मोबाइल, दोन दुचाकी असा २ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, सहायक फाैजदार रामचंद्र गुरव, मोना निकम, पंकजा जाधव, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, क्रांती निकम आदींनी या कारवाईत भाग घेतला.

ध्वनिफितीमुळे पुरावे सापडले

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ध्वनिफीत व्हायरल झाली होती. त्या ध्वनिफितीमध्ये वेश्या व्यवसाय करणारी महिला व पुरुष ग्राहकाचे संभाषण आहे. हे संभाषण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर कारवाई करण्यात आली.

Web Title: Prostitution business by young reel star in Satara, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.