प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळणार योग्य मोबदला

By Admin | Updated: September 14, 2014 00:00 IST2014-09-13T23:55:36+5:302014-09-14T00:00:28+5:30

शिरवळ-लोणंद चौपदरीकरणाचा तिढा : दुकानदार, व्यावसायिकांनाही भरपाई देण्याची प्रशासनाची भूमिका

Proper compensation for project affected farmers | प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळणार योग्य मोबदला

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळणार योग्य मोबदला

शिरवळ : शिरवळ-लोणंद चौपदरीकरण रस्त्याचा गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शेतकरी आणि प्रशासन यांच्या नुकतीच समन्वय बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त मोबदला देण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याने उच्च न्यायालयातील लढा मागे घेण्याची भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.
खंडाळा येथील तहसील कार्यालयात पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समिती व प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, रस्ते विकास महामंडळाचे अभियंता आर. वाय. पाटील, पी. आर. गायकवाड, यांची बैठक झाली. यामध्ये या रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना योग्य मोबदला देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी शासनाने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवून खड्डे मुजविण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांचे होणारे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करून त्याची भरपाई देण्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले आहे. व्यावसायिकांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.
यावेळी पुरुषोत्तम जाधव, समितीचे दत्तात्रय दगडे, कोंडिबा उम्रटकर, चंद्रकांत यादव, धनाजी जाधव, रमेश गोसावी, भिकू ननावरे, तनाजी चव्हाण, कुंडलिक दगडे, सदस्य उपस्थित होते.
अडतीस गावांतील शेतकऱ्यांना लाभ
गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लढा उभारला होता. रस्त्याच्या कामात ३८ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. योग्य मोबदला न दिलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे रस्त्याचे काम बारगळले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Proper compensation for project affected farmers