Satara ZP Election 2026: साताऱ्यात स्वबळावरील शिंदेसेनेला आमदारांचाच धक्का! पत्नीला मिळवून दिली भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:43 IST2026-01-22T13:11:59+5:302026-01-22T13:43:19+5:30
Satara ZP Election 2026: महायुतीत जिल्ह्यात कलह : पण खटाव, कोरेगाव अन् साताऱ्यात तह

Satara ZP Election 2026: साताऱ्यात स्वबळावरील शिंदेसेनेला आमदारांचाच धक्का! पत्नीला मिळवून दिली भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी
सातारा : जिल्ह्यात स्वबळावर लढणा-या भाजपाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र येण्यासाठी खलबते सुरू आहेत. त्याचवेळी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खटाव, कोरेगाव व सातारा तालुक्यात शिंदेसेने भाजपसोबत तह केल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी भाजप चिन्हावर खटाव गटासाठी अर्ज दाखल केला. खेड आणि कोडोली गटांत भाजपा उमेदवारांनी आमदार शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे यांच्या उपस्थितीत अर्ज भरले आहेत. तर कोरेगाव तालुक्यात भाजपाने उमेदवार न देता शिंदेसेनेशी तह केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीची बैठक घेतली. मात्र, भाजपाचे दोन्ही मंत्री आणि दोन्ही आमदारांनी पाठ फिरवली. औपचारिकता म्हणून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना पाठविल्याने शिंदेसेनेतून नाराजी व्यक्त झाली. भाजपाची वाढती महत्त्वाकांक्षा दिसू लागल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेसेनेतील नेत्यांमध्ये एकत्र येण्याबाबत बैठका सुरू आहेत.
कोरेगाव मतदारसंघात सोयीचे उमेदवार...
भाजपातील प्रमुख नेत्यांची बैठक साताऱ्यात सोमवारी झाली. बैठकीला मात्र शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी हजेरी लावली. त्याचवेळी कोरेगाव मतदारसंघात भाजपसोबत आमदार शिंदे हे तह करणार असल्याची चर्चा होती. या बैठकीवेळी आमदार शिंदे यांनी कोडोली आणि खेड मतदारसंघातील ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला भाजपाविरोधात काम केले, त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघातील उमेदवार ठरवताना भाजप आणि आमदार महेश शिंदे यांनी परस्परांची अडचण होणार नाही, याची काळजी घेत सोयीचे उमेदवार दिल्याचे दिसून आले.
साताऱ्यात भाजप, कोरेगावात शिंदेसेना...
काेरेगाव विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यातील गटांचा समावेश आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील कोडोली आणि खेड गट येतात. याठिकाणी भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज भरला. यावेळी खुद्द आमदार शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे यांची उपस्थिती होती. त्याचवेळी कोरेगाव मतदारसंघातील चार गटात शिंदेसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तिथे भाजपाने उमेदवार दिले नाहीत. खटाव गटात आमदार यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी अर्ज दाखल केला.
महायुतीत पेच झाल्याने पक्षांतर...
आमदार महेश शिंदे हे भाजपात असताना त्यांनी २०१९ च्या विधानसभेची तयारी केली होती. त्यावेळी कोरेगाव मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेला गेल्याने उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. त्यानंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी शिवबंधन बांधले. पुढे शिवसेनेत फूट पडली व त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपमध्येच कार्यरत होत्या. त्यामुळे शिंदे यांनी बंडखोरी केली नसल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.