शेतकऱ्यास धमकी देणाऱ्या कोळकीतील खासगी सावकारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 12:56 IST2022-01-27T12:55:18+5:302022-01-27T12:56:07+5:30
व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे साडेतीन लाख घेऊनही सोळा लाख रुपयांची करत होता मागणी

शेतकऱ्यास धमकी देणाऱ्या कोळकीतील खासगी सावकारास अटक
फलटण : निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे साडेतीन लाख घेऊनही सोळा लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, नवनाथ सदाशिव राणे (रा. कोळकी, ता. फलटण) याच्याकडून रामदास एकनाथ पिसाळ (रा. निंबळक, ता. फलटण) यांनी २०१० मध्ये दरमहा दहा टक्के व्याजदराने पन्नास हजार रुपये निंबळक (ता. फलटण) येथे घरी घेतले होते. त्याच्या मोबदल्यात पिसाळ यांनी संशयित आरोपीस २०१० ते २०१६ पर्यंत वेळोवेळी मिळून १ लाख ५० रुपये व त्यानंतर २०१७ ते २०२१ पर्यंत २ लाख रुपये म्हणजे अकरा वर्षांत मुद्दलाच्या सातपट पैसे रोख स्वरूपात दिले.
तरी देखील संशयित आरोपी राणे आजपर्यंतच्या व्याजापोटी फिर्यादीस आणखी सोळा लाख रुपये बेकायदेशीररीत्या मागत होता. ते न दिल्यास तारण म्हणून राणे याच्या नावे करून दिलेली जमीन पुन्हा माघारी न करता परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीला विकण्याची धमकी देत होता. शिवीगाळ करत होता. पिसाळ यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर नवनाथ राणे यास अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. अरगडे तपास करीत आहेत.