पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:08 IST2025-08-23T13:07:58+5:302025-08-23T13:08:39+5:30
काँग्रेस कार्यकर्त्यांनीही केला आरोप

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप
कराड (जि. सातारा) : ‘देशात विरोधी पक्षाने दुबार मतदार नोंदणीचा विषय लावून धरला आहे. महाराष्ट्रात तर दुबार मतदार नोंदणी पुनरावलोकन समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काम पाहत आहेत. मात्र, त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी दुबार व तिबार नावनोंदणी केली आहे,’ असा आरोप मतदार यादी पुराव्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला. या गैरप्रकाराला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मूकसंमती असल्याचे सांगत यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनीच ही कला साधली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. यावेळी कराड दक्षिण भाजपचे अध्यक्ष धनाजी पाटील, मोहनराव जाधव, मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे, कराडच्या माजी नगराध्यक्षा सुषमा लोखंडे उपस्थित होत्या.
धनाजी पाटील व मोहनराव जाधव म्हणाले, खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील घरामधील १५ व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये आहेत. आता एवढी सगळी मंडळी येथे राहतात का? हा संशोधनाचा भाग आहे, पण त्यांचे पुतणे इंद्रजित पंजाबराव चव्हाण, त्यांची पत्नी आशा इंद्रजित चव्हाण या दोघांची नावे कराड, मलकापूर व पाटण विधानसभा मतदारसंघांतील कुंभारगाव या ३ ठिकाणी मतदार यादीमध्ये आहेत.
इंद्रजित चव्हाण यांच्या आई शांतादेवी चव्हाण यांचे नाव देखील कराड व मलकापूर या २ ठिकाणी मतदार यादीमध्ये आहे, तर इंद्रजित चव्हाण यांचा मुलगा अभिजित इंद्रजित चव्हाण याचे नाव मलकापूरमधील एकाच मतदान केंद्रावर दोन ठिकाणी नोंदविले गेले आहे.
आमदार अतुल भोसले यांच्या दोन पीएंची दोन विधानसभा मतदारसंघात नावे : काँग्रेस
कार्यकर्त्यांचा आरोप
कराड : ‘भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहायक अमोल रायसिंग पाटील व फत्तेसिंग भीमराव सरनोबत हे दोघे सांगली जिल्ह्यातील आहेत. त्या दोघांची त्यांच्या मतदारसंघाबरोबरच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही नोंदणी आहे,’ असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला, तर कराडमध्ये कृष्णा विद्यापीठात शिकणाऱ्या इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचीही नावे शिवनगरच्या मतदार यादीत समाविष्ट करून घोळ केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कराड येथे शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले. यावेळी इंद्रजीत चव्हाण, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अजितराव पाटील-चिखलीकर, दिग्विजय सूर्यवंशी, प्रदीप जाधव उपस्थित होते.