Phaltan Doctor Death: प्रशांत बनकरला ३० पर्यंत पोलिस कोठडी; पाच दिवसांची केली होती मागणी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:45 IST2025-10-29T12:43:24+5:302025-10-29T12:45:08+5:30
त्यामुळे पुन्हा त्याच कारणावर कोठडी वाढविणे योग्य नाही

Phaltan Doctor Death: प्रशांत बनकरला ३० पर्यंत पोलिस कोठडी; पाच दिवसांची केली होती मागणी, पण...
फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याची आज पोलिस कोठडी संपली. त्यामुळे फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात त्याला मंगळवारी हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने बनकरला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील यांनी न्यायालयात बाजू मांडली. ते म्हणाले, आरोपीने डॉक्टर युवतीचा चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले. या कालावधीतील कॉल डिटेल्स, कागदपत्रे व पुरावे गोळा करण्याची गरज असल्याने आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली.
त्यावर आरोपीचे वकील ॲड. सुनील भोंगळे यांनी विरोध दर्शविला. ते म्हणाले, कॉल डिटेल्स मिळविण्यासाठी आरोपीची उपस्थिती आवश्यक नाही. मागील कोठडीवेळीही हाच मुद्दा मांडण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा त्याच कारणावर कोठडी वाढविणे योग्य नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रशांत बनकर यास ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्यायाची मागणी...
फलटण शहर पोलिस स्टेशनबाहेर आरोपीस न्यायालयात नेताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.