Satara: ..म्हणून कंपनीने खतविक्रेत्यांना दिली साग्रसंगीत पार्टी; बारबालांसमोर नाचणारे सोलापूर, बारामती, सांगलीसह कर्नाटकातील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:26 IST2025-01-10T14:25:51+5:302025-01-10T14:26:27+5:30
नावे लपविण्यासाठी पोलिसांकडे याचना..

Satara: ..म्हणून कंपनीने खतविक्रेत्यांना दिली साग्रसंगीत पार्टी; बारबालांसमोर नाचणारे सोलापूर, बारामती, सांगलीसह कर्नाटकातील
सातारा : पाचगणी येथील हाॅटेलमध्ये बारबालांसमोर नाचणारे २० जण हे सोलापूर, बारामती, सांगलीसह कर्नाटकातील असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. खत दुकानदारांनी खतविक्रीमध्ये चांगली कमाई करून दिल्याने संबंधित कंपनीने त्यांना पाचगणीतील हाॅटेलमध्ये साग्रसंगीत पार्टी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
पाचगणी येथील हिराबाग हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री ९ वाजता पाचगणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी १२ बारबाला बीभत्सपणे नृत्य करताना आढळल्या तर त्यांच्यासमोर काहीजण डान्स करत होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्वजण सोलापूर, सांगली, बारामती तसेच कर्नाटकातील खतविक्रेते आहेत. विक्रमी खत विकून कंपनीला मोठा लाभ मिळवून दिल्याच्या बदल्यात कंपनीने त्यांना चक्क बारबालांचा नृत्य कार्यक्रम आयोजित करून दिल्याचे तपासातून पुढे आले आहे.
दरम्यान, गेल्यावर्षीही पाचगणी पोलिसांनी अशाच पद्धतीने एका हाॅटेलवर छापा टाकला होता. त्यावेळीही बारबालांसमोर नाचणारे याच जिल्ह्यातील होते, असे पोलिसांनी सांगितले.
नावे लपविण्यासाठी पोलिसांकडे याचना..
आपण बारबालांसमोर नाचताना पकडले गेलो, हे कोणाला समजू नये. तसेच आपली नावे वर्तमानपत्रांमध्ये येऊ नयेत, यासाठी संबंधित खतविक्रेत्यांनी पोलिसांकडे याचना केली. आमचे कुटुंब उद्ध्वस्त होईल, असे एक विक्रेता पोलिसांना म्हणत होता.