आम्ही आधुनिक अभिमन्यू, दोन्ही मार्ग माहीत आहेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:06 IST2025-12-01T14:02:51+5:302025-12-01T14:06:31+5:30
अतुल भोसले यांना घेरण्याचा डाव. त्यात विरोधकांबरोबर काही आपलेही लोक; कराड येथील सभेत विरोधकांना टोला

आम्ही आधुनिक अभिमन्यू, दोन्ही मार्ग माहीत आहेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
कराड : कराडच्या पीचवरच नगरपालिका निवडणुकीत अतुल भोसले यांना घेरण्याचा डाव सुरू आहे. त्यात विरोधकांबरोबर काही आपलेही लोक आहेत; पण आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. आम्हाला दोन्ही मार्ग माहित आहेत, त्यामुळे हा चक्रव्यूह आम्ही भेदू’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
कराड येथे रविवारी कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, नीता केळकर, डॉ. सुरेश भोसले, विक्रम पावसकर, विनायक पावसकर, तेजस सोनवणे, अरुण जाधव यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कराडमध्ये आघाडीच्या माध्यमातून काही जण डॉ. अतुल भोसले यांना घेरण्याचा प्रयत्न करत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यांना आशीर्वाद देतील असं मला वाटलं होतं. पण असो.’
हे कसले समविचारी?
माझ्या विरोधात समविचारींची आघाडी केल्याचे विरोधक सांगताहेत. महायुती अन् महाविकास आघाडी वेगवेगळी आहे. एकमेकांच्या विरोधात आम्ही आहोत; पण त्यातल्या काहींना घेऊन तुम्ही कराडात आघाडी करता अन् समविचारी म्हणता. ही कसली समविचारी आघाडी असा सवाल आमदार अतुल भोसले यांनी करत विरोधकांवर हल्ला केला.
तर आमच्याकडे बँकेचा प्रमुख
खरंतर कराड पालिकेची निवडणूक आहे; पण काहीजण येथे आमच्याकडे बँकेची तिजोरी आहे असे सांगत आहेत. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, तुमच्याकडे तिजोरी असली तरी बँकेचा प्रमुख आमच्याकडे आहे, असे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.