डीजे वाजवा.. बघतो कोण काय म्हणतोय?; उदयनराजे भोसले यांचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:20 IST2025-08-19T16:20:27+5:302025-08-19T16:20:52+5:30
उदयनराजेंनी थेट डीजेच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केल्याने यंदाच्या गणेशोत्सवात सातारकरांच्या कानठळ्या बसणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

डीजे वाजवा.. बघतो कोण काय म्हणतोय?; उदयनराजे भोसले यांचा व्हिडीओ व्हायरल
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनोख्या शैलीची झलक सातारकरांना पुन्हा एकदा अनुभवता आली. त्यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या हटके अंदाजात कॉलर उडवत दहीहंडी सोहळ्यात तरुणाईची मने जिंकली; पण याही पुढे जात, ‘डीजे वाजवा, बघतो कोण काय म्हणतोय’ अशी गर्जना करून ‘डीजे’ला समर्थनही दिले. रविवारी रात्री हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
साताऱ्याच्या तालीम संघ मैदानावर दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. १७) रात्री झालेल्या या दहीहंडी सोहळ्यात सांगलीच्या शिवनेरी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. कार्यक्रमाची रंगत शिगेला पोहोचली असताना उदयनराजे भोसले यांनी स्टेजवर दमदार एंट्री केली. तरुणांचा उत्साह पाहून त्यांनी माइक हातात घेतला आणि थेट डीजेला पाठिंबा देणारी भूमिका जाहीर केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत टाळ्यांचा कडकडाट केला.
उदयनराजे यांनी आपल्या अनोख्या शैलीत कॉलर उडविली. यानंतर ‘डीजे वाजवा.. मी बघतो कोण काय म्हणतोय’, असे म्हणताच तरुणाईने एकच जल्लोष केला. उदयनराजे यांचा हा व्हिडीओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, तो चर्चेचा विषयही ठरला आहे.
भूमिका स्पष्ट.. आता पुढे काय?
गेले काही दिवस सातारा शहरात डीजे वाजवण्यावरून मतमतांतरे सुरू आहेत. एकीकडे गणेश मंडळे डीजेसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक शांततेच्या बाजूने आहेत. गणेश आगमन मिरवणुकीत नियमांची मर्यादा ओलांडली गेल्याने पोलिसांना कारवाईदेखील करावी लागली होती. आता उदयनराजेंनी थेट डीजेच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केल्याने यंदाच्या गणेशोत्सवात सातारकरांच्या कानठळ्या बसणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.