Phaltan Doctor Death: गोपाळ बदनेने 'दबंग' अधिकारी होण्याच्या अट्टाहासापायी केले अनेक कारनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:36 IST2025-10-29T13:34:27+5:302025-10-29T13:36:23+5:30
सोलापुरात विनयभंगाची तक्रार

Phaltan Doctor Death: गोपाळ बदनेने 'दबंग' अधिकारी होण्याच्या अट्टाहासापायी केले अनेक कारनामे
विकास शिंदे
फलटण : फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचा एक दबंग पोलिस अधिकारी अशी स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने अनेक कारनामे केल्याचे समोर येत आहे. त्याने पोलिस स्टेशनला साखर कारखान्यांचे वसुली केंद्र बनविले, तो नागरिकांशी रस्त्यावर हुज्जत घालतो, तसेच तो पोलिसांचे सिंडिकेट चालवत असल्याच्या आरोपांचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फलटण येथील पीडिता महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर फलटण ग्रामीणचा पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यामुळे आरोपी म्हणून बदने याला अटक झाली. त्यानिमित्ताने त्याने यापूर्वीही केलेले एक-एक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. एका महिलेने पीएसआय बदने याने आमच्या वडिलांना त्रास दिला. त्यानंतर आम्हालाही तोच अनुभव असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांकडे केला.
सोलापुरात विनयभंगाची तक्रार
गोपाळ बदने हा २०१३ मध्ये सोलापूर शहर पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाला होता. तो खात्याअंतर्गत परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला. दरम्यान, तो येथे शिपाई असताना त्याने जातिवाचक शिवीगाळ करत विनयभंग केल्याची तक्रार नोंदविली होती. या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांचे सिंडिकेट चालवायचा
बदने हा फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्व व्यवहार पाहत होता. एका अर्थाने तो पोलिसांचे सिंडिकेट चालवत होता. पीएसआय बदने सगळ्या प्रकारची देवाणघेवाण पाहत असल्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये त्याचा रुबाब होता, असे त्याच्या खात्यातील काही कर्मचारी सांगतात.
कौतुक अन् संबंधही...
गांजा तस्करी करत असलेली गाडी त्याने पकडली होती. हातापायांची सालटे निघाली, तरी त्याने गुन्हेगार सोडले नव्हते. त्याच्या कौतुक सोहळ्याला स्वतः एसपी समीर शेख हजर होते. या प्रकरणाची दुसरी बाजू दबक्या आवाजात बोलली जाते. गांजा तस्करांवरील कारवाईबद्दल त्यांचे कौतुक होते; तसेच बदनेचे त्यांच्याशी संबंधही असल्याचे बोलले जाते.
गाड्या अडवून तपासणी करायचा
फलटणच्या समाजमाध्यमांवर बदनेचे अनेक व्हिडीओ फिरत आहेत. त्यांपैकी एक व्हिडीओ तो सिव्हिल ड्रेसमध्ये असताना आणि वाहतूक पोलिसाची जबाबदारी नसताना गाड्या अडवून त्यांची तपासणी करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी संबंधित चालकाने त्याला चांगलेच धारेवर धरले होते. तिथून त्याने पळ काढल्याचे स्पष्ट दिसत आहे