Phaltan Doctor Death: फौजदार गोपाळ बदने, इंजिनिअर बनकरची जिल्हा कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:58 IST2025-11-03T16:54:31+5:302025-11-03T16:58:00+5:30
चाैकशीदरम्यान दोघांच्या मोबाइलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली

Phaltan Doctor Death: फौजदार गोपाळ बदने, इंजिनिअर बनकरची जिल्हा कारागृहात रवानगी
सातारा : फलटण येथील डाॅक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेला फाैजदार गोपाळ बदने तसेच इंजिनिअर प्रशांत बनकर यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
फलटण येथील न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्यांना तातडीने शनिवारी सायंकाळी फलटणहून साताऱ्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. फाैजदार बदने याने चारवेळा अत्याचार केला तर इंजिनिअर बनकर याने मानसिक छळ केला, असे तळहातावर लिहून डाॅक्टर युवतीने २३ ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हाॅटेलमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली.
फलटण पोलिसांनी तातडीने दखल घेऊन दोघांना अटक केली. पोलिस कोठडीत चाैकशीदरम्यान दोघांच्या मोबाइलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली आता या प्रकरणाचा तपास सुरू राहणार आहे. सातपुते यांनी शनिवारी साताऱ्यात येऊन तपासाचा तातडीने आढावा घेतला मात्र, तपासात नेमके धागेदोरे काय मिळालेत, हे अत्यंत गोपनीय ठेवले जात आहे.