Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:02 IST2025-10-27T19:00:59+5:302025-10-27T19:02:12+5:30
Phaltan Doctor Death Case: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यू प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, ज्या दिवशी ती हॉटेलवर गेली, त्यापूर्वी प्रशांतच्या घरी काय घडले होते, याबद्दल आता माहिती समोर आली आहे.

Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
Phaltan Doctor Death News: मूळची बीड जिल्ह्यातील आणि फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. फलटणमधील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिच्या तळहातावर सुसाईड लिहिलेली होती. यात प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोघांवर गंभीर आरोप केले गेले आहेत. पण, ज्या रात्री डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये आली, त्यापूर्वी प्रशांत बनकरच्या घरी काय घडले होते? याबद्दल पोलिसांनी तपास केला आहे. याबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.
रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये पोलिसांकडून प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. आतापर्यंत केलेल्या तपासात काय आढळले, याचीही माहिती त्यांनी घेतली.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांतमध्ये काय घडलं?
रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली. तेव्हा डॉक्टर तरुणी ही प्रशांत बनकरच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी, लक्ष्मीपूजनासाठी होती. प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरुणीमध्ये फोटो काढण्यावरून वाद झाला. फोटो नीट आले नाहीत, म्हणून हा वाद झाला."
"प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरुणीमधील भांडणं वाढले. वाद वाढल्यानंतर डॉक्टर तरुणी घरातून निघून एका मंदिराजवळ गेली. त्यानंतर प्रशांत बनकरचे वडील तिथे गेले आणि तिची समजूत घातली. रात्री मंदिराजवळ थांबू नका, म्हणत त्यांनी तिला घरी आणले. त्यानंतर डॉक्टर तरुणी घरातून बाहेर पडली आणि हॉटेलवर गेली", अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
डॉक्टर तरुणीने प्रशांतला पाठवले फोटो अन् मेसेज
रुपाली चाकणकर म्हणाल्या, "डॉक्टर तरुणी हॉटेलवर गेली. त्यानंतरही तिचे प्रशांत बनकर सोबत मोबाईलवरून संभाषण सुरूच होते. तिने रात्रभर प्रशांत बनकरला मेसेज केले. पण, प्रशांतने मोबाईल बंद करून ठेवला होता आणि त्यामुळे वाद वाढला."
"हॉटेलवर गेल्यावर डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला मी आत्महत्या करेन असा मेसेज केला आणि त्याला फोटोही पाठवले होते. त्यावर तू याआधीही मला अनेकदा अशी धमकी दिली आहे, असे उत्तर प्रशांत बनकरने तिला दिले", असे दोघांमध्ये संभाषण झाले होते अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
डॉक्टर तरुणी तीन महिने गोपाल बदनेच्या संपर्कात
"जानेवारी ते मार्च या काळात डॉक्टर तरुणी आणि निलंबित करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हे संपर्कात होते. त्यांच्यात अनेकदा संभाषण झाले होते. नंतर डॉक्टर तरुणी आरोपी प्रशांत बनकरच्या संपर्कात होती. पोलिसांनी सीडीआर काढला आहे. डॉक्टर तरुणीने गोपाळ बदनेने चार वेळा बलात्कार केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे. त्यामुळे त्या दोघे कधी कुठे भेटले होते, ते ठिकाण कोणते? हे सीडीआरच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीडीआर आणि फॉरेन्सिकच्या रिपोर्टमधून हे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे", असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.