Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 21:26 IST2025-10-30T21:25:39+5:302025-10-30T21:26:49+5:30
Phaltan Doctor Death News: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली, तर गोपाळ बदनेच्या वकिलांनी शंका उपस्थित करत त्याला विरोध केला.

Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
Phaltan Doctor Death Court Update: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस अधिकारी गोपाळ बदनेला अटक केलेली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचे सांगत दोघांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर गोपाळ बदनेच्या वकिलांनी तरुणीच्या हातावरील सुसाईड नोटबद्दल खळबळजनक दावा करत बदनेला कोणत्या आधारावर अटक केली, असा सवाल केला.
आरोपी प्रशांत बनकर आणि निलंबित पीएसआय गोपाळ बदने या दोघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आली. प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोपींकडून आणखी माहिती हवी आहे. त्यामुळे पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. गोपाळ बदने हा पोलिसांना सहकार्य करत नाही, त्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढवावी, असेही सरकारी वकील न्यायालयात म्हणाले.
प्रशांत बनकरचा लॅपटॉपमध्ये काय मिळाले?
आरोपी प्रशांत बनकर याचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात फोटो, व्हिडीओ, स्क्रीन शॉट मिळाले आहेत. दोघांची नावे मयत तरुणीने हातावर लिहिलेली आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर त्यांचे नाही, असा दावा केला जात आहे. पण, अजून हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल येणं बाकी आहे. तोपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पण...
पोलीस कोठडी वाढवण्याला विरोध करत गोपाळ बदनेचे वकील न्यायालयात म्हणाले की, "हॉटेलमध्ये मृत डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट कोणालाही दिसली नाही. पण, पोस्टमार्टम रूमध्ये हातावर सुसाईड दिसून आली, हे कसे शक्य आहे?", असा सवाल वकिलाने कोर्टात केला.
"मूळात सुसाईड नोटमधील अक्षर हे मृत डॉक्टर तरुणीचे नाही, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. मग, यांना कोणत्या आधारावर अटक केली आहे. ज्या आधारावर पोलीस कोठडी मागितली आहे, त्याचा तपास सुरू आहे. त्याच आधारावर आता परत ५ दिवस कोठडी देता येऊ शकत नाही. चॅट्सचे विश्लेषण सुरू आहे, असे सांगितले जात आहे. मग अधिक तपास करण्यासाठी वेळ कशाला पाहिजे?", असे प्रश्न उपस्थित करत बदनेच्या वकिलांनी कोठडी वाढवून देण्याला विरोध केला. सुनावणी अंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची कोठडी सुनावली.