Satara: निगेटिव्ह रक्ताची पॉझिटिव्ह कहाणी; कोसोदूरचा संपर्क कामी, उंब्रज येथील परेशकुमार यांनी बिहारमधील रुग्णाला उपलब्ध करुन दिले रक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:15 IST2025-12-30T18:14:59+5:302025-12-30T18:15:24+5:30
रुग्णासाठी ‘बी निगेटिव्ह’ रक्ताची होती तातडीची गरज

Satara: निगेटिव्ह रक्ताची पॉझिटिव्ह कहाणी; कोसोदूरचा संपर्क कामी, उंब्रज येथील परेशकुमार यांनी बिहारमधील रुग्णाला उपलब्ध करुन दिले रक्त
अजय जाधव
उंब्रज : एखाद्याला मदत करण्यासाठी भौगोलिक अंतर अडसर ठरत नाही, हवी असते ती केवळ माणुसकी. हीच माणुसकी उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते परेशकुमार कांबळे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे. उंब्रज येथे वास्तव्यास असतानाही उंब्रज ते सुपोल असे तब्बल दोन हजार किलोमीटर अंतरावरील बिहार राज्यातील सुपोल येथील रुग्णाला दुर्मिळ बी निगेटिव्ह रक्त उपलब्ध करून देत त्यांनी त्या रुग्णाला जीवदान दिले.
उंब्रज येथे फुलाचे हार विक्री करून उपजीविका करणारे परेशकुमार कांबळे हे ‘मदत रक्ताची संघटना, महाराष्ट्र’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध सामाजिक संघटना व रक्तदाते यांच्याशी त्यांचे नेटवर्क आहे. रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी दुकानावर काम करत असतानाच बिहारमधील सुपोल येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णासाठी ‘बी निगेटिव्ह’ रक्ताची तातडीची गरज असल्याचा संदेश त्यांना मिळाला.
हा रक्तगट दुर्मिळ असल्याने स्थानिक पातळीवर रक्त उपलब्ध होत नव्हते. परिस्थितीची गंभीरता ओळखून परेशकुमार यांनी तत्काळ बिहारमधील समाजसेवक मित्र कार्तिक चौधरी यांच्याशी संपर्क साधला. कार्तिक यांनी तत्काळ प्रयत्न करून ब्लड बँकेतून मोफत ‘बी निगेटिव्ह’ रक्त उपलब्ध करून दिले. काही तासांतच रक्त मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचले. सध्या थंडीमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी असून, अनेक ठिकाणी रक्ताची कमतरता भासत आहे. अशावेळी महाराष्ट्रातून बिहारपर्यंत मदतीचा हात पोहोचणे ही उल्लेखनीय बाब ठरली आहे.
गेल्या १८ वर्षांत हजारो रुग्णांना रक्त मिळवून देत स्वतः ९२ वेळा रक्तदान केले. या सेवेत कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणाच्या तरी जीवनासाठी आपण उपयोगी पडतो, ही भावना अपार समाधान देणारी आहे. - परेशकुमार कांबळे, संस्थापक अध्यक्ष, मदत रक्ताची संघटना, महाराष्ट्र
‘इतनी दूर रहते हुए भी परेशकुमार जी ने हमें ब्लड दिलवाने में जो मदद की, उसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं।आपने हमें ब्लड उपलब्ध करवाकर एक सच्चा भाईचारा कायम किया है। ब्लड मिलने के बाद मरीज की हालत अब काफी बेहतर है। धन्यवाद परेश भैया।’ - सुभाषकुमार यादव, सुपोल, बिहार, रुग्णाचे नातेवाईक