दहावीत ४० टक्के मार्कस्, पण सायन्सला ॲडमिशन हवंय; कला शाखेकडे ओढा कमी
By दीपक देशमुख | Updated: July 4, 2025 18:11 IST2025-07-04T18:10:45+5:302025-07-04T18:11:32+5:30
अनुदानित तुकड्या बंद पडण्याची भीती

दहावीत ४० टक्के मार्कस्, पण सायन्सला ॲडमिशन हवंय; कला शाखेकडे ओढा कमी
दीपक देशमुख
सातारा : दहावीत मुलांना कमी गुण असले, तरी विज्ञान शाखाच हवी, असा पालकांसह विद्यार्थ्यांचा अट्टाहास वाढत आहे. अभ्यासक्रम पेलण्याची क्षमता नसणारा विद्यार्थीविज्ञान शाखेकडे ओढला जातो. त्यामुळे कला शाखेकडे यंदाही ओढा कमी आहे. राज्यात कला शाखेच्या तिप्पट अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत. त्यामुळे शासनाने कला शाखेच्या अभ्यासक्रम कालानुरुप बदलण्याची व विशेष आर्थिक तरतूद वाढविण्याची अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
राज्यातून १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली. यामध्ये २ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी कलाशाखेसाठी ऑनलाईन अर्ज केला. तर विज्ञान शाखेसाठी ६ लाख ९ हजार जणांनी नोंदणी केली. विज्ञान शाखेतून विविध वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळला.
यामुळे गुण कितीही कमी असले, तरी विज्ञान शाखेलाच प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरू आहे. परिणामी कला शाखेकडे जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात कलाशाखा बंद पडण्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
कला शाखेसाठी विशेष तरतूद..
एका तुकडीत ८० विद्यार्थी अपेक्षित आहेत. परंतु, प्रवेश कमी होत असल्याने काही अनुदानित तुकड्या बंद होणार आहेत. अनुदानित तुकडी टिकवण्यासाठी शासनाने निकष शिथिल करण्याची गरज आहे. तसेच कला शाखेसाठी विशेष तरतूद करण्याची गरज आहे, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्याची गरज
कला शाखेत भाषा, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र असे अनेक महत्त्वपूर्ण विषय आहेत. तथापि, याबरोबरच कला शाखेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम शिकता आला, तर त्यांना जास्त संधी उपलब्ध हाेतील. इतर अभ्यासक्रमांमध्येही कला शाखेतील एखादा विषय ऐच्छिक ठेवता येतील. याविषयी शासनाने विचार करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
सामाजिक असंवेदनशीलतेमुळे सध्या सामाजिक क्रौर्य वाढू लागले आहे. कला शाखेतून संवेदनशील माणूस घडत असतो. कला शाखा ही समाज घडविण्यासाठी गरजेची आहे. अनेक साहित्यिकांचे लेखन, समाजसुधारकांचे कार्य, देशाचा इतिहास, राजकारण, संविधान याची माहिती युवकांना होणे गरजेचे आहे. यातूनच जागृत नागरिक तयार होतात. शासनाने कला शाखेच्या तुकड्या सुरक्षित राहण्यासाठी विशेष तरतूद करावी. - प्रा. सुनील शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य - राज्य कार्याध्यक्ष
सरकारने कला शाखेचे सक्षमीकरण झाले पाहिजे. पारंपरिक घोकमपट्टी अभ्यासक्रम बदलून प्रायोगिक अभ्यासक्रम सुरू व्हावेत. नवे हितकारक काय करता येईल यावर विचार व्हावा. व्यावसायिक, भाषिक, कौशल्य आधारित शिक्षण देण्याची गरज आहे. विज्ञान शाखेकडे जेवढ्या गांभिर्याने पाहिले जाते तेवढेच गंभीरपणे काम कला शाखेसाठी व्हावे. - प्रा. सुभाष वाघमारे, उपप्राचार्य, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा