Satara: ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा!, फलटण येथे मुक्काम 

By दीपक शिंदे | Published: July 9, 2024 07:22 PM2024-07-09T19:22:55+5:302024-07-09T19:23:21+5:30

ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

Palkhi Sohla of Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj entered the city of Phaltan satara | Satara: ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा!, फलटण येथे मुक्काम 

Satara: ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा!, फलटण येथे मुक्काम 

फलटण : अमृताहूनी गोड, विठ्ठलाची ओढ,
                पांडुरंग पांडुरंग बोलती अभंग
श्री संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातील या ओळींप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम.. तुकाराम’सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा मंगळवारी महानुभाव व जैन पंथीयांची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फलटणनगरीत एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला.

तरडगाव येथील पालखी तळावरून सकाळी सहा वाजता सोहळ्याच्या प्रस्थानानंतर हा सोहळा सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवण व वडजल येथे विसावा घेतला. पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्वीकार करून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठलभक्तांसमवेत संध्याकाळी पाच वाजता फलटण शहरात दाखल झाला. टाळ-मृदुंगांच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठू दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी स्वागत केले.

माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सद्गुरू हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह लाखो भाविकांच्या जनसमुदायाचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमानतळावर एका दिवसासाठी मुक्कामासाठी विसावला.

वारीत सहभागी लाखो वारकऱ्यांसह शहर व तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरतीनंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणरांनी रांगा लावल्या. फलटण शहरातील ऐतिहासिक राम मंदिर व जबरेश्वर मंदिर येथेही दर्शनासाठी वारकरी व महिलांनी रांगा लावल्या होत्या.

फलटण येथे अनेक वारकऱ्यांनी सोमवारीच येण्यास सुरुवात केली होती. पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र उत्सव आनंदाचा, चैतन्याचा, स्फूर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा असे वातावरण होते. पालखी सोहळ्याचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकऱ्याचे सकाळपासूनच शहरात आगमन होत होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका यामुळे अवघे फलटण शहर विठ्ठलमय झाले होते.

वारकऱ्यांसाठी पाणी टँकरद्वारे पुरविण्यात आले. पालखी तळावर व शहरात ठिकठिकाणी फिरती शौचालये व स्वच्छतागृहे उभारली होती. पुरवठा विभागातर्फे पालखीतळावर गॅस सिलिंडर व रॉकेल उपलब्ध करून दिले होते. आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात येत होते. वीज पुरवठा खंडित होणार नाही याची व्यवस्था केली होती. वारकऱ्याच्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालखीतळावर नगर पालिकेच्या वतीने मदत केंद्र कक्ष उभारण्यात आला होता.

Web Title: Palkhi Sohla of Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj entered the city of Phaltan satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.