चिमुरडीवर अत्याचार मुलाकडून; मृतदेहाची विल्हेवाट आईकडून ! नेर येथील खून प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 19:20 IST2018-03-24T19:18:41+5:302018-03-24T19:20:00+5:30
सातारा : खटाव तालुक्यातील नेरच्या निष्पाप चिमुरडीच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून खून केला.

चिमुरडीवर अत्याचार मुलाकडून; मृतदेहाची विल्हेवाट आईकडून ! नेर येथील खून प्रकरण
सातारा : खटाव तालुक्यातील नेरच्या निष्पाप चिमुरडीच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच्या आईने हा मृतदेह रात्री गुपचूपपणे विहिरीत नेऊन टाकला. दरम्यान, आरोपी माय-लेकाला पोलिसांनी अटक केली.
याबाबतची माहिती अशी की, नेर येथील आठ वर्षांची बालिका बुधवार, दि. २१ मार्च रोजी गावातून खेळताना गायब झाली होती. त्यानंतर शुक्रवारी तिचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता गावातीलच एका अल्पवयीन शाळकरी मुलाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या असंबंद्ध बोलण्यावरून पोलिसांचा संशय वाढत गेला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता या गुन्ह्याचे त्याने कबुली दिली.
‘पैशाचे आमिष दाखवून या चिमुरडीला गावातील बांधकाम सुरू असलेल्या नवीन बंगल्यात घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. यावेळी मुलीने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगू, असे म्हणताच त्याचठिकाणी तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर रात्री आईची मदत घेऊन तिचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत टाकला,’ अशी कबुली या अल्पवयीन मुलाने दिली.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह पोलीस पथकाने हा खून उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, सविता विजय काशीद (वय ३५, रा. नेर) हिला तिच्या अल्पवयीन मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.