Satara: बेकायदेशीर शेअर ॲपच्या माध्यमातून एकास ४२ लाखांचा गंडा, अज्ञातांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:37 IST2026-02-06T17:35:48+5:302026-02-06T17:37:17+5:30
व्हॉटस्ॲप कॉलद्वारे शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल. मात्र, त्यासाठी २० टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले.

Satara: बेकायदेशीर शेअर ॲपच्या माध्यमातून एकास ४२ लाखांचा गंडा, अज्ञातांवर गुन्हा दाखल
कराड : एका नोकरदार व्यक्तीची तब्बल ४२ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आल्याची घटना सैदापूर, ता. कराड येथे घडली आहे.
भरत दशरथ काकडे, रा. सैदापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया व बेकायदेशीर शेअर ॲपच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तासवडे एमआयडीसीतील कंपनीत सैदापूर येथील भरत काकडे नोकरी करत आहेत.
८ डिसेंबर २०२५ रोजी फेसबुकवरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधत शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर युविका सान्याल असे नाव सांगणाऱ्या महिलेने लिंक पाठवून एका व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये त्यांना ॲड केले. या ग्रुपमध्ये १६० पेक्षा अधिक सदस्य होते. दररोज मोठ्या नफ्याचे स्क्रीनशॉट त्यामध्ये शेअर केले जात होते. २० डिसेंबर रोजी व्हॉटस्ॲप कॉलद्वारे शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल. मात्र, त्यासाठी २० टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले.
तसेच पॅन कार्डची माहिती घेतल्यानंतर एक ॲप डाउनलोड करून खाते सुरू करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार भरत काकडे यांनी पैसे भरले. सुरुवातीला ९९ हजार, त्यानंतर ५० हजार, त्यानंतर १.२५ लाख व २.२० लाख अशी रक्कम भरायला सांगत ॲपमध्ये नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आणखी एक ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले.
दिनांक ८ जानेवारी २०२६ पर्यंत वेगवेगळ्या पर्यायाने ऑनलाइनद्वारे पैसे पाठवण्यात आले. याप्रकारे भरत काकडे यांच्याकडून एकूण ४२ लाख ३५ हजार २६० रुपये आरोपींनी उकळले. १३ जानेवारी रोजी त्यांनी नफा दाखविलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता तो नाकारण्यात येऊन त्यांच्याशी संपर्क तोडण्यात आला.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भरत काकडे यांनी सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. तसेच कराड शहर पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञातांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.