Satara Accident News: तोंडलजवळ भरधाव कारच्या धडकेत एक ठार; सात जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:33 IST2025-12-16T16:32:57+5:302025-12-16T16:33:20+5:30
जखमींमध्ये पादचाऱ्याचाही समावेश

Satara Accident News: तोंडलजवळ भरधाव कारच्या धडकेत एक ठार; सात जखमी
शिरवळ : लोणंद-शिरवळ रस्त्यावरील वीर धरणालगत तोंडल हद्दीत भरधाव कारने लोणंद बाजूकडून शिरवळ बाजूकडे येत असलेल्या कारला धडक दिली. यामध्ये कार चालक ठार झाला, तर पादचाऱ्यांसह सात जण गंभीर जखमी झाले. सलीम हमीदभाई शिकलगार (वय ४५, रा. शिरवळ) असे ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.
लक्ष्मण भरत माने, विक्रमा आनंदा भंडलकर, बाळकृष्ण रामचंद्र कोंढाळकर, विष्णू लक्ष्मण शिरवले, हिराबाई बापू मरळ, छाया विजय देवडे, ताराबाई विठ्ठल देवडे अशी जखमींची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील सलीम हमीदभाई शिकलगार हे कारने (एमएच १२-एसक्यू ८३०९) काही कामानिमित्त लोणंदला गेले होते. सलीम शिकलगार हे काम उरकून परत शिरवळ बाजूकडे येत असताना तोंडल हद्दीत आले असता, शिरवळ बाजूकडून लोणंद बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या कारने (एमएच १३-ईसी १९९७) जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये कारमधील व रस्त्यावरून चालत निघालेले आठ जण जखमी झाले. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, सारोळा महामार्ग मदत केंद्राचे पोलिस अधिकारी, कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी धाव घेतली. शिरवळ ग्रामपंचायत रुग्णवाहिका, १०८ रुग्णवाहिका व खासगी वाहनातून गंभीर जखमींना शिरवळ, लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी कार चालक सलीम शिकलगार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमी लक्ष्मण भरत माने (वय ३०, सध्या रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा, मूळ रा. सोलापूर), विक्रमा आनंदा भंडलकर (३०, रा. भादवडे, ता. खंडाळा), बाळकृष्ण रामचंद्र कोंढाळकर (६४, रा. तोंडल, ता. खंडाळा), विष्णू लक्ष्मण शिरवले (३९, रा. तरडगाव, ता. फलटण), हिराबाई बापू मरळ (६०, रा. शिरवळ), छाया विजय देवडे (४५), ताराबाई विठ्ठल देवडे (६५, तिघे रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कार चालकाचे पलायन
दरम्यान, घटना स्थळावरून अपघातानंतर कार चालकाने पलायन केल्याने पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू होता. लक्ष्मण माने यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रात्री उशिरापर्यंत शिरवळ पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.