सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा 

By नितीन काळेल | Updated: April 1, 2025 19:00 IST2025-04-01T18:58:41+5:302025-04-01T19:00:58+5:30

कऱ्हाड परिसरात वादळासह हजेरी 

Occasional rains in Satara district, relief for citizens from heatwave | सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा 

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा 

सातारा : जिल्ह्यात एप्रिल महिन्याची सुरूवात वळवाने झाली असून मध्यरात्रीच्या सुमारास कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तर सातारा शहरातही काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला.

जिल्ह्यात मार्च महिना सुरू झाल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत गेली. सुरूवातीला ३५ ते ३६ अंशाच्या घरात असणारे कमाल तापमान नंतर वाढत गेले. त्यामुळे मार्चच्या मध्यावरच पूर्व माण, खटाव आणि फलटण तालुक्यात ४० अंशाचा टप्पा पार केला होता. तर सातारा शहरातील कमाल तापमान ३९ अंशावर गेले होते. यामुळे दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री उकाड्याचा सामना करावा लागत होता. याचा शेतीची कामे तसेच बाजारपेठेवरही परिणाम झाला होता.

गेल्या तीन दिवसांपासून उकाडा प्रचंड वाढला होता. दुपारच्या सुमारास तर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अधूनमधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. त्यामुळे वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त होत होता. हा अंदाज आता खरा ठरला आहे. काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास कऱ्हाडसह मलकापूर परिसरात वळीव पडला.

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर पावसाला सुरूवात झाली. जवळपास एक तासभर पाऊस पडत होता. पण, यामध्ये वादळाचाच जोर अधिक होता. त्याचबरोबर कऱ्हाड परिसरात आठवड्यात दुसऱ्यांदा वळवाचा पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील अनेक भागातही वळवाचा पाऊस झाल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Occasional rains in Satara district, relief for citizens from heatwave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.