फलटण: मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या दबावास बळी पडून सरकारने ओबीसी आरक्षण विरोधी भूमिका घेऊ नये तसेच कुणबी नोंदींची पडताळणी करून खोट्या नोंदी रद्द कराव्यात या मागण्यांसाठी फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती तर्फे फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात, जाती निहाय जनगणना करावी तसेच ओबीसी नेत्यांवर वारंवार जे हल्ले होत आहेत त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे यासह आदी मागण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजता नाना पाटील चौक येथे ओबीसी संघर्ष समितीने रस्ता रोको आंदोलन केले.
पुणे-पंढरपूर महामार्गावर वाहतूक कोंडी
तब्बल एक तास पुणे-पंढरपूर महामार्ग आंदोलकांनी रोखला होता. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. फलटण बसस्थानकात सर्व एसटी बसेस अडकून पडल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. यावेळी विविध पक्षातील तसेच ओबीसी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस व प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.