आता नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:07 IST2026-01-05T17:06:29+5:302026-01-05T17:07:04+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: चार दिवसांत ८ लाखांवर साहित्य संमेलनस्थळी भेट

आता नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले
छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल ८ लाख साहित्यरसिकांनी भेट दिली आहे. आता पुढील अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे यजमानपदही साताऱ्याला मिळावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
सातारा येथे ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोपप्रसंगी ते बोलत होत. व्यासपीठावर उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराजे देसाई, आमदार भरत गोगावले, महेश शिंदे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
वाचा: मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे ३२ वर्षांपूर्वी सातारा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यानंतर या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मला मिळाले याचा विशेष आनंद आहे. त्यावेळप्रमाणेच यंदाचेही संमेलन यशस्वी झाले आहे. संमेलनाच्या चार दिवसांत परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने, गझल कट्टा असे विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
वाचा : अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळविलेल्या स्वराज्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या काळात अटकेपार गेला परंतु, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास झाकोळला गेला आहे. विश्वास पाटील यांनी आपल्या लेखणीतून थोरले शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावरही प्रकाश टाकावा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
सामंत यांच्याशी नाट्यसंमेलनासाठी मैत्री वाढविणार
उदय सामंत यांनी साहित्य संमेलनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे भरपूर कौतुक केले असले तरी आमची मागणी संपली नाही. आता नाट्यसंमेलनासाठी अशीच मैत्री जोपासावी, अशी मिश्किल भाषेत टिप्पणी केली. या टिपण्णीला सामंत यांनीही आपल्या भाषणात उत्तर देताना हे कौतुक मला महागात पडणार असल्याचे सांगत सहकार्यात कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.