Yashwantrao Chavan death anniversary: 'ही' खेदाची बाब, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निषेध व्यक्त करणार - सुप्रिया सुळे
By प्रमोद सुकरे | Updated: November 25, 2025 15:52 IST2025-11-25T15:51:34+5:302025-11-25T15:52:23+5:30
तिजोरीची चावी जनतेकडे असते..

Yashwantrao Chavan death anniversary: 'ही' खेदाची बाब, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निषेध व्यक्त करणार - सुप्रिया सुळे
कराड : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्या कामात व्यस्त असल्याने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडला उपस्थित राहू शकले नसतील. पण प्रशासनाकडूनही येथे कोणतीही हालचाल न दिसणे ही खेदाची बाब आहे. राज्यात सरकार कोणाचेही असूदेत दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माझा निषेध नोंदवणार आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
कराड येथे मंगळवारी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, आजचा महाराष्ट्र हा पंडित जवाहरलाल नेहरू व यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. त्यांच्या स्मृतिस्थळी येणे ही महाराष्ट्राच्या ऋणातून मुक्त होण्याची भावना आहे. म्हणून प्रत्येक वर्षी या ठिकाणी एकदा तरी येण्याचा मी प्रयत्न करते.
तिजोरीची चावी जनतेकडे असते ..
राज्याच्या तिजोरीची चावी कोणाकडे? याबाबत सध्या चर्चा सुरूआहेत. त्याबाबत छेडले असता सुळे म्हणाल्या, तिजोरीची चावी कोणाकडेही नसते तर ती जनतेकडे असते. मायबाप जनतेचा पैसा हा लोकशाहीतील अधिकार असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे.
अशांना पक्षातून हकलले पाहिजे..
ज्याने क्रूर हत्या केली त्याची एखाद्या नेत्याने कार्यक्रमांमध्ये आठवण काढणे यावरून त्यांची विचारसरणी काय आहे हे लक्षात येते. अशांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी ते आवश्यक आहे असे म्हणत सुळे यांनी आमदार धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला.
मग महामार्गाचे काम कोणी रोखले?
ट्रिपल इंजिन सरकार असल्याचा तुम्ही गर्व करता. मग महामार्गाचे काम कोणी रोखलेय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.याचे उत्तर सरकारने द्यावे असेही त्या एका प्रश्नावर म्हणाल्या.
ते अगोदर कोणत्या पक्षात होते?
भाजपचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आयात केल्याची टीका केली आहे. याकडे लक्ष वेधले असता सुप्रिया सुळे यांनी अगोदर ते कोणत्या पक्षात होते? असा खोचक टोला लगावला.