तीन वर्षांच्या कामासाठी तब्बल नऊ वर्षे -: सातारा-पुणे महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:50 AM2019-11-12T00:50:45+5:302019-11-12T00:52:19+5:30

दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावरील खड्ड्यांची आजपर्यंत अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, ही कामे दीर्घकाळ टिकू शकली नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

Nine years for three years of work | तीन वर्षांच्या कामासाठी तब्बल नऊ वर्षे -: सातारा-पुणे महामार्ग

सातारा-पुणे महामार्गावरील सारोळे येथील या पुलाचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. हा पूल पूर्ण होण्यासाठी अजून किती वेळ लागणार? याचे उत्तर कोणाकडेच नाही.

Next
ठळक मुद्दे३४ खड्डे ठरताहेत जीवघेणे; दोन वर्षांत या मार्गावरील अपघातांमध्ये ७४७ जणांचे बळी

प्रगती जाधव-पाटील।
सातारा/कोल्हापूर : दळणवळण हे कोणत्याही शहराच्या विकासाचा कणा मानला जातो. पुणे-सातारा मार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी १ आॅक्टोबर २०१० ला सुरुवात झाली. हे काम ३१ मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र १४० किलोमीटरचा हा रस्ता गेल्या सव्वा नऊ वर्षांत अद्यापही

‘जैसे थे’ अवस्थेतच आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतून पुणे-मुंंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर पहिले काही वर्षे हा रस्ता सर्वांसाठी वरदायी ठरला होता. अवघ्या दोन तासात सातारा-पुणे आणि चार तासांत पुणे-कोल्हापूर असा प्रवास अनेकांसाठी सुखदायी ठरत होता; पण पुढे देखभालीअभावी या रस्त्याची वाताहत होत गेली.

यंदा झालेल्या उच्चांकी पावसामुळे सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे; पण राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ७४७ जणांचे बळी गेले आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग दिवस-रात्र वाहनांनी ओसंडून वाहत असतो.

विक एंडला तर वाहनांच्या रांगाच रांगा, हे चित्र अगदी ठरलेलेच असते. अशा स्थितीत या रस्त्यावरून जाणाऱ्यांचे जेवणापासून शौचालयापर्यंत हाल होतात. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची अवस्था लक्षात घेता येथून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. दिवसा उजेडात किमान रस्ता तरी स्पष्ट दिसतो. रात्री तर खड्ड्यांची खोली आणि लांबीचाही अंदाज न आल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुठला खड्डा चुकवावा आणि कोणत्या खड्ड्यातून गाडी न्यावी, याचा विचार करेपर्यंत अपघात होत असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना महामार्गावरून प्रवास करताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावरील खड्ड्यांची आजपर्यंत अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, ही कामे दीर्घकाळ टिकू शकली नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

महामार्गावर बहुतांशी ठिकाणी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. महामार्गावरून प्रवास करणाºया पर्यटकांचीही बºयाचदा फसगत होताना दिसते. हा महामार्ग आहे की खड्ड्यांची शर्यत? असा प्रश्न प्रत्येकजण उपस्थित करीत आहे.


सेवा रस्ते उरले फक्त नावाला
नियमानुसार महामार्गावर साडेसात मीटर रुंदीचे सेवा रस्ते असणे अत्यावश्यक आहे. असे असताना सातारा ते शिरवळपर्यंत कोठेही सेवा रस्ते नाहीत. ज्या ठिकाणी आहेत त्यांची रुंदी कमी असल्याने एकावेळी दोन वाहने ये-जा करू शकत नाहीत.
अनेक सेवा रस्त्यांवरून थेट महामार्गावर येण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांवरून महामार्गावर येण्याच्या प्रयत्नात असणारे अनेकजण वेगाने येणाऱ्या गाड्यांचे बळी पडत आहेत.


तब्बल पाचवेळा प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ

  • १ आॅक्टोबर २०१० रोजी सातारा-पुणे या सुमारे १४० किलोमीटर रस्त्याच्या सहापदरीकरणाची सुरुवात. ३१ मार्च २०१३ ला हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
  • प्रत्यक्षात मात्र या कामाला गेल्या सव्वानऊ वर्षांत तब्बल पाचवेळा मुदतवाढ मिळाली. इतक्यांदा मुदतवाढ मिळाल्यानंतरही या कामाची गती कुठेच वाढलेली दिसली नाही.

 

काही वर्षांपूर्वी स्वारगेट-कोल्हापूर हे अंतर अवघ्या चार तासांत पार केलं जायचं. सध्या रस्त्यातील खड्ड्यांमुळे हे अंतर किमान सात तासांचे झाले आहे. पूर्वी कुटुंबीय गावी येण्याचा आग्रह करायचे. आता चित्र बदलले आहे. जीव धोक्यात घालून येण्यापेक्षा फोनवरच खुशाली कळवत राहा, असं सांगतात.
सौरभ देसाई, कोल्हापूर

Web Title: Nine years for three years of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.