नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 21:27 IST2026-04-07T21:23:59+5:302026-04-07T21:27:57+5:30
Neelam Shinde: अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या नीलम शिंदेची मृत्यूंशी झुंज संपली. शनिवारी (२८ मार्च) रोजी निधन झाले.

नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
सातारा : कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथून अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या लाडक्या लेकीची तब्बल १४ महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नीलम शिंदेचे शनिवारी (२८ मार्च) रोजी निधन झाले. आता तिचे अंतिम दर्शन वडिलांना व्हिडीओ कॉलवरून घ्यावे लागणार आहे.
नीलम तानाजी शिंदे (वय ३५) ही तरुणी अमेरिकेत एमएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होती. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी योगा क्लासवरून सायकल बाइकवरून होस्टेलकडे परतत असताना भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली.
या अपघातात तिच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली आणि ती कोमात गेली. अपघाताची माहिती मिळताच तिचे वडील तानाजी शिंदे आणि नातेवाईक गौरव कदम तातडीने अमेरिकेत पोहोचले.
दोन महिने उपचार, पण मृत्यूने गाठलेच
नीलमची आत्यादेखील अमेरिकेत राहत असल्याने उपचारांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. जवळपास दोन महिने रुग्णालयात उपचार आणि सेवा केल्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वडील भारतात परतले. मात्र, नीलमच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
कॉल आणि कुटुंबातील सगळे कोसळले
अमेरिकेतून २८ मार्च रोजी आलेला फोन कॉल शिंदे कुटुंबासाठी काळजाला चिरून टाकणारा ठरला. नीलमची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली आणि ती कायमची निघून गेली. वृद्धापकाळामुळे वडिलांना पुन्हा अमेरिकेला जाणे शक्य नसल्याने तिच्या अंत्यविधीला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही.
सातासमुद्रापार गेलेली लेक कायमची दुरावली
भारतीय वेळेनुसार मंगळवार, ७ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता अमेरिकेत नीलमचा अंत्यविधी पार पडणार आहे. हा विधी व्हिडीओ कॉलिंगद्वारे पाहूनच वडील तानाजी शिंदे, मामा संजय कदम, कुटुंबीय आणि गावकरी तिचे अंतिम दर्शन घेणार आहेत.
सातासमुद्रापार शिक्षणासाठी गेलेली आपली लेक आता कायमची दुरावली, या दुःखाने शिंदे कुटुंब शोकसागरात बुडाले असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
नीलमने जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. तो आम्ही पूर्ण केला. तिच्या जाण्याचे दुःख मोठे आहे; पण, तिच्या अवयवदानामुळे इतरांना जीवन मिळेल, हीच समाधानाची बाब आहे. -संजय कदम, नीलमचे मामा, उंब्रज (वडगाव)