नवजा, महाबळेश्वरला धुवांधार पाऊस; गतवर्षीपेक्षा अधिक;  कोयना धरण पाणीसाठ्यात १० दिवसांत ३६ टीएमसी वाढ

By नितीन काळेल | Published: July 26, 2023 12:40 PM2023-07-26T12:40:56+5:302023-07-26T12:41:16+5:30

यंदा उशिरा पाऊस सक्रिय होऊनही पश्चिमेकडे मागील वर्षीपेक्षा अधिक पाऊस

Navja, Mahabaleshwar in Satara district will soon record three thousand millimeters of rain this year | नवजा, महाबळेश्वरला धुवांधार पाऊस; गतवर्षीपेक्षा अधिक;  कोयना धरण पाणीसाठ्यात १० दिवसांत ३६ टीएमसी वाढ

नवजा, महाबळेश्वरला धुवांधार पाऊस; गतवर्षीपेक्षा अधिक;  कोयना धरण पाणीसाठ्यात १० दिवसांत ३६ टीएमसी वाढ

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात उशिरा पाऊस सुरू होऊनही गतवर्षीच्या तुलनेत अधिक पडलेला आहे. नवजा, महाबळेश्वरच्या पावसाने तर यंदा लवकरच तीन हजार मिलीमीटरचाही टप्पा पार केला आहे. यामुळे धरणेही भरु लागल्याने चिंता कमी होऊ लागली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठ्यात अवघ्या १० दिवसांत ३६ टीएमसीने वाढ झाली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर तालुक्यात दरवर्षी पाच हजार मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद होते. यातील काेयना, नवजा, पाथरपूंज आणि महाबळेश्वर हा तर अतिवृष्टीचा भाग समजला जातो. या भागात मान्सून दाखल झाल्यापासून सतत पाऊस पडत असतो. त्यामुळे कमी दिवसांतही येथे अधिक पाऊस होतो. यावर्षी तर मान्सूनचा पाऊस उशिरा सक्रीय झाला. १५ दिवस उशिरा आलेल्या या पावसाने आतापर्यंत मागीलवर्षीची बरोबरी केली आहे. त्यातच सध्याही धो-धो पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

पश्चिम भागातील कोयनानगर येथे गतवर्षी २६ जुलैपर्यंत २२३० मिलीमीटर पाऊस पडला होता. तर नवजा येथे २८४६ आणि महाबळेश्वरला २९८२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. पण, यावर्षी आतापर्यंत एक महिन्याच्या काळातच येथील पाऊस गतवर्षीची बरोबरी करुन पुढे गेलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोयनानगरला २३४० तर नवजा येथे ३२७४ आणि महाबळेश्वरला ३१०३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. यंदा उशिरा पाऊस सक्रिय होऊनही पश्चिमेकडे मागीलवर्षीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. त्यातच आणखीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोयना धरणात ६१ टीएमसीवर पाणीसाठा...

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणात बुधवारी सकाळच्या सुमारास ६१.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात ५७ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. १६ जुलैपासून धरणात ३६.४० टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. तर १० दिवसांत कोयनेला १३३१, नवजा येथे १८४८ आणि महाबळेश्वरला १६३० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: Navja, Mahabaleshwar in Satara district will soon record three thousand millimeters of rain this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.