The murder of a young man on account of love affair | प्रेमसंबंधाच्या कारणावरून युवकाचा खून -: सख्ख्या भावांना अटक
प्रेमसंबंधाच्या कारणावरून युवकाचा खून -: सख्ख्या भावांना अटक

ठळक मुद्देरेठरेतील घटना ; लाकडी दांडक्याने केली मारहाण

क-हाड : नात्यातील युवतीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत युवकाचा खून करण्यात आला. रेठरे कॉलनी, ता. कºहाड येथे बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

अनिकेत राजेश रसाळ (वय २४, रा. कार्वे, ता. क-हाड) अने खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जयदीप शंकर रसाळ व रविराज शंकर रसाळ (दोघेही मूळ रा. कार्वे, सध्या रा. रेठरे कॉलनी) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद अभिकांत राजेश रसाळ यांनी कºहाड तालुका पोलिसांत दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथील अनिकेत रसाळ व त्याचा भाऊ अभिकांत हे दोघेजण सेंट्रिंग काम करीत होते. अनिकेतचे गावातीलच जयदीप रसाळ याच्या नात्यातील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. जयदीप रसाळ व रविराज रसाळ हे मूळचे राहणारे कार्वे येथीलच आहेत. मात्र, कामानिमित्त ते सध्या रेठरे कॉलनी येथे राहत होते. दरम्यान, नात्यातील युवतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून जयदीप आणि रविराज यांचा अनिकेतशी वारंवार वाद झाला होता. मात्र, त्या वादावर तात्पुरता पडदा पडायचा.

दरम्यान, अनिकेतचे ज्या युवतीशी प्रेमसंबंध होते त्या युवतीचा मंगळवार, दि. १३ विवाह होता. हा विवाह सोहळा त्या दिवशी पार पडला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भाऊ अभिकांत सेंट्रिंगच्या कामावर निघून गेला. तर अनिकेत घरातच होता. रात्री उशिरा अभिकांत घरी आला असता पोलिसांनी त्यांच्या वडिलांना पोलीस ठाण्यात नेल्याचे समजले. त्यामुळे तो तातडीने पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी अनिकेतचा खून झाला असल्याची माहिती अभिकांतला मिळाली.
गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अनिकेत हा जयदीप आणि रविराज ज्याठिकाणी राहतात त्याठिकाणी गेला होता. अनिकेतला पाहताच त्या दोघांचा रागाचा पारा चढला. त्यांनी त्याला पकडून नजीकच्या शेतात नेले. त्याठिकाणी त्यांनी लाकडी दांडके व लाथाबुक्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी जयदीप आणि रविराज यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्या.


पाय मोडला; बरकड्याही तोडल्या!
अनिकेतला आरोपींकडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे पोलिसांनी त्याचा भाऊ अभिकांतला सांगितले. अनिकेतच्या हातावर, पायावर, गालावर, मांडीवर मारहाणीच्या खुणा होत्या. तसेच डोक्यात जखम होती. त्या जखमेतून रक्त येत होते. तसेच त्याचा एक पाय मोडल्याचे आणि बरकड्याही तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे अभिकांतने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

 


Web Title: The murder of a young man on account of love affair
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.