Satara: लाच प्रकरणातील मुंबईच्या फौजदारासह एकाला अटक, न्यायाधीश निकम यांचा जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:58 IST2024-12-18T15:57:33+5:302024-12-18T15:58:00+5:30

२१ पर्यंत पोलिस कोठडी 

Mumbai police officer one arrested in bribe demand case in satara, Judge Nikam applies for bail in High Court | Satara: लाच प्रकरणातील मुंबईच्या फौजदारासह एकाला अटक, न्यायाधीश निकम यांचा जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

Satara: लाच प्रकरणातील मुंबईच्या फौजदारासह एकाला अटक, न्यायाधीश निकम यांचा जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मुंबई पोलिस दलातील सहायक फौजदारासह अन्य एकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यातील प्रमुख संशयित न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

आनंद मोहन खरात (रा. खरातवाडी, दहिवडी, ता. माण) तसेच मुंबई येथे कार्यरत असलेला सहायक फाैजदार किशोर संभाजी खरात (रा. सांगली, सध्या बीडीडी चाळ वरळी, मुंबई) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका युवतीने तक्रार दिली होती. तिच्या वडिलांवर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्यांना अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. तो तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. तो जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी किशोर खरात व आनंद खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यानुसार महिलेकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जोशी यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, या गुन्ह्यामधील आनंद खरात, तसेच किशोर खरात हे दोघे सोमवारी दुपारी स्वत:हून जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविले. मंगळवारी दुपारी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी या दोघांचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली होती. दुपारी न्यायालयाने मुंबईच्या फाैजदारासह अन्य एकाला अटक करण्याची परवानगी दिली.

Web Title: Mumbai police officer one arrested in bribe demand case in satara, Judge Nikam applies for bail in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.