Satara: मुलाच्या खूनप्रकरणी आईसह प्रियकरास जन्मठेप, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने दिले होते कालव्यात ढकलून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:08 IST2025-02-01T13:56:10+5:302025-02-01T14:08:09+5:30
वाई : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने लहान मुलाला कालव्यामध्ये ढकलून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलाची आई ...

Satara: मुलाच्या खूनप्रकरणी आईसह प्रियकरास जन्मठेप, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने दिले होते कालव्यात ढकलून
वाई : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने लहान मुलाला कालव्यामध्ये ढकलून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलाची आई आणि तिचा प्रियकर या दोघांना वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अश्विनी प्रकाश चव्हाण (वय ३५, वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) हिने २८ एप्रिल २०१९ रोजी गौरव प्रकाश चव्हाण हा चार वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दिली होती. तपासादरम्यान तिच्या बोलण्यात विसंगती आढळून येत होती. ती प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती तपासी अधिकाऱ्यांना देत होती. यामुळे पोलिसांना संशय आला. तिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिने अनैतिक संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४८, बावधन, ता. वाई) याच्या मदतीने आपल्या लहान मुलाला धोम धरणाच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी कालव्यात शोध मोहीम राबविल्यानंतर मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेसह प्रियकर सचिन कुंभार याला अटक केली होती.
सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. वाई येथील अतिरिक्त सत्र व फौजदारी न्यायालयात न्या. आर. एम. मेहरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. अनैतिक संबंधामध्ये अडथळा येत असल्याने मुलाला कालव्यात फेकून त्याचा खून केल्याचा सरकारी वकील एम. यू. शिंदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मुलाची आई अश्विनी चव्हाण व तिचा प्रियकर सचिन कुंभार यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पोलिस कर्मचारी हेमा कदम यांनी न्यायालयीन कामात साह्य केले. वाई येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा हा पहिलाच खटला आहे. सदर खटल्यात ॲड. ए. आर. कुलकर्णी, ॲड. डी. एस. पाटील (सहा. सरकारी अभियोक्ता ), ॲड. दिनेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम, परि. पोलिस उपअधीक्षक पानेगावकर, वाई पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी काम पाहिले.