सातारा जिल्ह्यात २४ मंडलात अतिवृष्टी, कऱ्हाड तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार
By नितीन काळेल | Updated: May 23, 2025 17:00 IST2025-05-23T17:00:29+5:302025-05-23T17:00:54+5:30
शेत जमीनही वाहून गेली, ६ जनावरे, १५० कोंबड्यांचा मृत्यू अन् ४० घरांची पडझड

संग्रहित छाया
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून २४ तासांत तब्बल २४ महसुल मंडलात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर पावसामुळे आतापर्यंत मोठ्या ६ जनावरांचा आणि १५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० घरांचेही नुकसान झालेले आहे. कऱ्हाड तालुक्यात शेतात खत टाकण्यासाठी गेल्यावर तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसल्याने वृध्द शेतकरी ठार झाला. तसेच पेरले येथे शेत जमीन वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे.
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. सोमवारपासून तर पावसाची उसंतच नाही. रात्रं-दिवस पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे नुकसानीच्याही घटना घडू लागल्या आहेत. वळवाच्या पावसामुळे वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी १ तर माण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी २ असे मिळून एकूण ६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर खटाव तालुक्यातच १५० कोंबड्याचाही मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
सततच्या पावसात घरांचीही पडझड सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० घरांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. सातारा आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी १२ घरांचे तर कोरेगावला ६, वाई तालुक्यात ४, पाटण ३, माणमध्ये २ आणि खंडाळा तालुक्यात एका घराची पडझड झालेली आहे.
पेरलेतील शेतकऱ्याचा मृत्यू; वडोलीत जमीन वाहून गेली..
कऱ्हाड तालुक्यातील पेरले येथील संभाजी सूर्यवंशी (वय ७०) हे गुरूवारी सायंकाळी शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे पावसामुळे अर्धा एेकर शेत जमीन वाहून गेली. त्यामुळे हळद पिकाचे नुकसान झाले आहे.
६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस..
२४ तासांत जिल्ह्यातील तब्बल २४ मंडलात अतिवृष्टी झाली. ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. सातारा तालुक्यातील सातारा मंडलात ७६.८ मिलिमीटरची नोंद झाली. तर वर्ये ९३, कण्हेर ७७, अंबवडे ८९, दहिवड ७७, परळी मंडलात ८९ मिलिमीटर पाऊस झाला. जावळी तालुक्यात मेढा १०३, आनेवाडी ११०, कुडाळ ९८, बामणोली १२८, केळघर आणि करहर मंडलात १०३ मिलिमीटर पाऊस पडला.
कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन ६६.५ आणि किन्हई मंडलात ८८.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. वाई तालुक्यातील पसरणी मंडलात १०३, भुईंज आणि पाचवड ८४, धोम आणि वाई मंडल ७२ तर ओझर्डेत ७१ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा मंडलात सर्वाधिक १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वर आणि पाचगणी मंडल १०३ आणि लामजला ७९ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.