जिहे-कठापूर, म्हसवड एमआयडीसीबाबत पंतप्रधानांकडे साकडे, मंत्री जयकुमार गोरेंनी घेतली नरेंद्र मोदींंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:42 IST2025-08-22T16:36:59+5:302025-08-22T16:42:21+5:30
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान..

जिहे-कठापूर, म्हसवड एमआयडीसीबाबत पंतप्रधानांकडे साकडे, मंत्री जयकुमार गोरेंनी घेतली नरेंद्र मोदींंची भेट
सातारा : नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्रीजयकुमार गोरे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत जिहेकठापूर आणि उरमोडी पाणी योजना, म्हसवड एमआयडीसी तसेच राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व मंजूर प्रकल्पांच्या कामांना गती देण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीत माण-खटाव मतदारसंघातील म्हसवड येथील औद्योगिक वसाहतीला राज्यशासनाने मंजुरी देऊन जमीन अधिग्रहणासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. या औद्योगिक वसाहतीला केंद्राकडून ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर योजनेच्या वाढीव कामांना राज्यशासनाने २०२४ मध्ये मान्यता दिली आहे. उरमोडी योजनेच्या कामांचीही सुधारीत किंमत ३,०४२ कोटी ठरविण्यात आली आहे. या योजनेची निम्मी कामे झाली असली तरी उर्वरित कामांसाठी केंद्राच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिहे कठापूर आणि उरमोडी वाढीव योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घेऊन निधीची तरतूद करण्याबाबत पंतप्रधान मोदींबरोबर चर्चा करण्यात आली. नव्याने निर्माण होत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रीप उभारणीचे प्रयोजन आणि त्याबाबत कार्यवाहीची चर्चा करण्यात आली.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण होणे गरजेचे असल्याने त्या कामाला गती देण्याविषयी पंतप्रधानांबरोबर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री गोरे आणि माजी खासदार नाईक-निंबाळकर यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान..
ग्रामविकास मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती. या भेटीत त्यांनी दि. १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार असल्याचे सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली.