मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरण: रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह अकरा जणांना वडूज पोलिसांचे समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:15 IST2025-05-03T14:15:12+5:302025-05-03T14:15:39+5:30
खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना ५ मेपर्यंत पोलिस कोठडी

मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरण: रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह अकरा जणांना वडूज पोलिसांचे समन्स
वडूज : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिस ठाण्याकडून सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह इतर अकरा जणांना देखील नोटीस दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुणे स्थित घरीही पोलिसांचे पथक चौकशीसाठी गेले होते.
दि. २ रोजी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनादेखील नोटीस बजावली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते हजर राहू शकले नाहीत. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व इतर ११ जणांना वडूज पोलिस ठाण्याकडून नोटीस बजावल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.
लोकांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्यांना समन्स : गोरे
आयुष्यभर दुसऱ्यांची घरं उद्घवस्त केली, गोरगरिबांना त्रास दिला. आता त्यांनीच तयार केलेले पुरावे पोलिसांनी गोळा केले. म्हणूनच समन्स आले असेल. आता चौकशीला जावे, असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे यांना लगावला. महाबळेश्वर येथे माध्यमांनी त्यांच्याशी साधल्यानंतर त्यांनी मत व्यक्त केले.
मंत्री गोरे म्हणाले, माझ्याकडे अनेक ऑडिओ आहेत. ज्यात कोणी कोणाशी संपर्क झाला, काय व्यवहार झाले याची माहिती आहे. पोलिसांनी हे पुरावे मागितले तर देणार आहे. माझ्या खुनाची ऑफर दिली होती. त्याचे ऑडिओ मी पोलिसांना दिले होते. परंतु, त्यांनी राजकीय दबाव आणून प्रकरण दाबले. आता कारवाई होत असताना त्याचा फार बाऊ केला जात आहे. त्यांनी पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे, असेही गोरे म्हणाले.