Satara: तासवडेतील रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; यंत्रसामग्री अन् माल जळून कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:02 IST2026-03-31T17:01:57+5:302026-03-31T17:02:13+5:30

स्फोटामुळे सुमारे २ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरून गेला, अग्निशमनच्या जवानांची जिवाची बाजी

Massive explosion at a chemical company in an industrial estate in Taswade Karad taluka satara | Satara: तासवडेतील रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; यंत्रसामग्री अन् माल जळून कोट्यवधींचे नुकसान

Satara: तासवडेतील रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; यंत्रसामग्री अन् माल जळून कोट्यवधींचे नुकसान

कराड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कराड तालुक्यातील तासवडे येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘एम्ब्रोजिल बेस’ उत्पादनाशी संबंधित एसकेएस फाइन केम कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटामुळे सुमारे २ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरून गेला. स्फोटात सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी कंपनीतील यंत्रसामग्री व माल जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्फोट हा शॉर्टसर्किटमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, याची नोंद तळबीड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापक सचिन मानकर (वय ४५, रा. मानकरवस्ती, तळबीड ता. कराड) यांनी तळबीड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये ‘एम्ब्रोजिल बेस’ उत्पादनाशी संबंधित एसकेएस फाइन केम (प्लॉट नं. बी -१/४७) हि कंपनी आहे. कंपनीचे मालक सर्जेराव किसन साळुंखे (रा. उंब्रज, मूळ रा. पाटण तालुका) असून, एसकेएस फाइन केम कंपनी २०२२ मध्ये सुरू करण्यात आली. कंपनीत १२ कर्मचारी व ३ सिक्युरिटी गार्ड असून, कंपनी २ शिफ्टमध्ये चालते. कंपनीमध्ये ॲमरॉक्झीन हायड्रोक्लोराइड बेस मटेरियलवर प्रक्रिया करून ते रॉ मटेरियल केमिकल कंपन्यांना पाठविले जाते.

रविवारी (दि. २९ रोजी) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कंपनी बंद करून सर्व कर्मचारी घरी निघून गेले. यावेळी वॉचमन प्रवीण तांबे (रा. शिरवडे, ता. कराड) हे कंपनीमध्ये कामास आले व बाहेरील केबीनमध्ये थांबले होते. सोमवार (दि. ३०) रोजी सकाळी आठ वाजता कंपनी चालू झाली. त्यावेळी कंपनीमध्ये सागर नामदेव दांगट, विनायक राजाराम शेलार, प्रशांत विलास शेलार (सर्व रा. मलकापूर, शाहुवाडी जि. कोल्हापूर) हे कंपनीमध्ये कामास आले.

तळबीड पोलिसांकडून घटनेचा पंचनामा

कंपनीचे काम चालू असताना, आठ वाजून १५ मिनिटांनी सागर दांगट याने बॉयलर पेटविला, तसेच सागर, विनायक, प्रशांत, वॉचमन दयानंद मोहिते गेट जवळ बोलत उभे राहिले होते. त्यावेळी अचानक कंपनीमधून रिॲक्टरचा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर तळबीडचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे व कराड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकास स्फोट झाल्याची माहिती आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी दोन अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. यानंतर तळबीड पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी घेतली स्फोटाची माहिती

भीषण स्फोटाची माहिती मिळताच प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्याकडून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

अग्निशमनच्या जवानांची जिवाची बाजी

केमिकल कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच कराड पालिकेचे अग्निशमन विभागाचे अधिकारी श्रीकांत देवघरे हे विनोद काटरे, संजय अडसूळ, विक्रम जाधव, सतीश पवार, राहुल कांबळे, अक्षय शेलार, भारत जावळे, जयवंत शुगर कारखान्याचे दत्तात्रय रांजणे, चालक सचिन कांबळे, सह्याद्री कारखान्याचे सुहास सूर्यवंशी, चालक हणमंत गायकवाड, अजिंक्यतारा कारखान्याचे अधिक महाडिक, प्रशांत काशीद, हरी जाधव, धनाजी साळुंखे या १६ जाबाज अग्निशमन जवानांची सलग पाच तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Web Title : सतारा रासायनिक संयंत्र में भीषण विस्फोट, भारी नुकसान

Web Summary : सतारा के तासवडे में एक रासायनिक कंपनी में भीषण विस्फोट हुआ, जिससे संपत्ति का भारी नुकसान हुआ, लेकिन कोई हताहत नहीं हुआ। शॉर्ट सर्किट का संदेह है। दमकल कर्मियों ने पांच घंटे तक आग बुझाई।

Web Title : Massive Blast at Satara Chemical Plant Causes Extensive Damage

Web Summary : A major explosion rocked a chemical company in Taswade, Satara, causing significant property damage but no casualties. Short circuit is suspected. Firefighters battled the blaze for five hours.