Satara: शिवथरच्या विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, पळून जाण्यास नकार दिल्याने चिडून गळा चिरला; प्रियकराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:19 IST2025-07-09T12:19:14+5:302025-07-09T12:19:42+5:30
मुलगा आईविना पोरका, सातारा तालुका पोलिसांची पुण्यात कारवाई

Satara: शिवथरच्या विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, पळून जाण्यास नकार दिल्याने चिडून गळा चिरला; प्रियकराला अटक
शिवथर : शिवथर (ता. सातारा) येथील गुजाबा वस्तीवरील पूजा प्रथमेश जाधव (वय ३०) या विवाहितेच्या खुनाचा छडा अवघ्या आठ तासांत लावण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले. तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, प्रियकराला पुण्यातून पोलिसांनी अटक केली.
अक्षय रामचंद्र साबळे (वय २७, रा. शिवथर, ता. सातारा) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पूजा जाधव हिचा सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पती प्रथमेश हा साताऱ्यातील एका दुकानात काम करतो. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामावर गेला, तर सासू-सासरे शेतात आणि पाचवी इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. पूजा घरात एकटीच होती. दुपारी चारच्या सुमारास तिचे सासरे घरी आले. त्यावेळी हा खुनाचा प्रकार निदर्शनास आला. पूजाचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे समोर आले होते.
सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी या घटनेनंतर तातडीने पोलिसांची विविध पथके तयार केली. यातील एका पथकाला पूजा हिचे अक्षय साबळे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांचे एक पथक तातडीने पुणे येथे गेले. स्वारगेट येथून अक्षय साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर त्याने पूजा जाधव हिच्या खुनाची कबुली दिली.
गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे, अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजित गुरव, सोनू शिंदे, हवालदार दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, रामचंद्र गोरे, आशिष कुमठेकर, सतीश बाबर, आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला.
पळून जाण्यास नकार दिल्याने खून
सहा वर्षांपासून दोघांचे अनैतिक संबंध होते. आपण पळून जाऊन लग्न करू, असा वारंवार तगादा लावला होता. परंतु, तिने नकार दिला. याच कारणावरून चिडून जाऊन हाताने गळा दाबला. त्यानंतर कटरने गळा चिरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हा गुन्हा केवळ आठ तासांत उघडकीस आणला.
मुलगा आईविना पोरका
पूजा जाधव हिचा मुलगा आठ वर्षांचा आहे. आपली आई या जगात नाही, याची पुसटशीही कल्पना त्याला नाही. आई कुठे आहे, असे तो वडिलांना विचारतोय. हे पाहून घरातल्यांना अश्रू अनावर होत आहेत.