मराठवाडीचे पाणी गावांमध्ये घुसले -: जमीन खचली; पूल पाण्याखाली; संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:48 IST2019-07-11T20:48:23+5:302019-07-11T20:48:59+5:30
येथील विद्यार्थ्यांसह शेकडो लोक अडकून पडले. तर वाल्मिक पठाराला जोडणारा पवारवाडीनजीकचा पूल सुमारे सहा तास पाण्याखाली राहिल्याने अनेकांची अडचण निर्माण झाली.

मराठवाडीचे पाणी गावांमध्ये घुसले -: जमीन खचली; पूल पाण्याखाली; संपर्क तुटला
ढेबेवाडी : ढेबेवाडी विभागात गुरुवारी दिवसभर संततधार कोसळणाºया पावसामुळे वांग-मराठवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अचानकपणे पाणीसाठा वाढल्याने मेंढ येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि मंदिरात पाणी घुसले. तर उमरकांचन येथील स्मशानभूमी आणि पाण्याच्या विहिरीला जलसमाधी मिळाली.
ढेबेवाडी विभागात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काढणेनजीकचा पूल दिवसभर पाण्याखाली गेला होता. तर याच पुलाचा कठडा तुटल्याने पूल धोकादायक बनला आहे. वाल्मिक पठारावरील अनेक गावांना तसेच वाड्यावस्त्यांना जोडणारा पवारवाडीनजीकचा पूलही पाण्याखाली गेल्याने येथील जनतेचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढनजीक जमीन खचल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आठ दिवसांपासून या विभागात पावसाची रिपरिप चालू आहे. मात्र गुरुवारी सकाळपासूनच अचानकपणे पावसाचा जोर वाढला. ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. वांग-मराठवाडी धरणाच्या परिसरामध्ये तर प्रचंड प्रमाणात कोसळणाºया पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ होऊ लागली. बघता-बघता पाण्याने मेंढ येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि जोतिर्लिंग मंदिराला वेढा दिला. गावानजीकची जमीनही खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
उमरकांचन येथील पाण्याची विहीरच धरणाच्या पाण्यात बुडाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे. याच नदीवर काढणेनजीक असलेला पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. येथील विद्यार्थ्यांसह शेकडो लोक अडकून पडले. तर वाल्मिक पठाराला जोडणारा पवारवाडीनजीकचा पूल सुमारे सहा तास पाण्याखाली राहिल्याने अनेकांची अडचण निर्माण झाली.