कलगीतुऱ्यात अडकले अनेकांचे भविष्य!

By Admin | Updated: September 14, 2014 00:00 IST2014-09-13T23:59:34+5:302014-09-14T00:00:16+5:30

सभापतिपदासाठी अनेकांचे बाशिंग : कऱ्हाड, खंडाळ्याचा तिढा कसा सुटणार ?

Many fugitives in future! | कलगीतुऱ्यात अडकले अनेकांचे भविष्य!

कलगीतुऱ्यात अडकले अनेकांचे भविष्य!

प्रमोद सुकरे, कऱ्हाड : राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना साताऱ्यात मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडीत ‘बिघाडी’च पाहायला मिळत आहे़ आता अडीच वर्षांचा पहिला अंक संपल्यानंतर रविवारी दुसरा अंक सुरू होतोय़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ‘राग’ आघाडीधर्म आळविला जाईल, असे वाटत आहे; पण गत दोन दिवसांत दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या कलगीतुऱ्यामुळे अनेक इच्छुकांचे भविष्य टांगणीला लागले आहे़
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात आघाडी आहे़ त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतही तशीच आघाडी राहील, अशी आशा काँग्रेसजनांना वाटत होती़ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ पुरेसे असतानाही काँग्रेसला एखादे सभापतिपद देऊन सत्तेत सहभागी करून घेतील, अशी अटकळही बांधली जात होती; पण कदाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठेपणा द्यायचा नाही, या हेतूने तसं घडलं नसावं़
जिल्हा परिषदेचा विषय दूरच; पण मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात नगरपरिषदही काँग्रेसकडे राहणार नाही, याची दक्षता बारामतीच्या दादांनी प्रामाणिकपणे घेतली़ त्याहीपुढे जात कऱ्हाड पंचायत समितीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असताना राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा करिष्मा स्थानिक नेत्यांनी केला़ खंडाळ्यात तर राष्ट्रवादीने चक्क सेनेशी हातमिळवणी करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यातच धन्यता मानली़
या सर्व प्रकारामुळे राज्यात आघाडी सरकार असले तरी, जिल्ह्यात मात्र बिघाडीचेच वातावरण असल्याचे दिसते. नव्याने होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील निवडीत भूतकाळातील घडामोडींना पूर्णविराम देऊन नवा अध्याय सुरू होईल काय? अशी चर्चा दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात सुरू होती़ मात्र, गेले दोन दिवस दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे़ रविवारी होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडीसंदर्भात गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांचे भविष्य टांगणीला लागले आहे, हे मात्र नक्की!
 

Web Title: Many fugitives in future!