Satara: भोंदू मांत्रिकाकडं आलिशान कार अन् गळाभर सोनं!, इंदापूरच्या मंगेश भागवत याचे बरेच कारनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:41 IST2025-01-10T17:41:11+5:302025-01-10T17:41:37+5:30
लुटीतून त्यानं उभारलं साम्राज्य; म्हसवड पोलिस कारवाई करणार का?

संग्रहित छाया
सातारा: पैशांचा पाऊस पाडून देतो, असे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या मंगेश भागवत या मांत्रिकाचे बरेच कारनामे समोर येत आहेत. त्याच्याकडे आलिशान कार आहे तर गळाभर सोनं घालून तो लोकांना इंप्रेस करायचा. अनेकांना लुबाडून त्याने अनेक ठिकाणी प्लाॅट खरेदी केल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. यातून त्याने मोठं साम्राज्य उभं केलं असून, म्हसवड पोलिस त्याचे हे लुटीचे साम्राज्य उद्ध्वस्त करणार का, याकडे माण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
माण तालुक्यातील देवापूर येथील कांता बनसोडे (वय ६०) यांच्यासह पाचजणांना भोंदू मांत्रिक मंगेश भागवत आणि सर्जेराव वाघमारे यांनी तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले होते. या मांत्रिकावर म्हसवड पोलिस ठाण्यात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अद्यापही म्हसवड पोलिसांनी अटक केली नाही. लोकांना लुटण्यासाठी मांत्रिक मंगेश भागवत याने पैशांच्या पावसाचे आमिष दाखविले. लूट केलेल्या पैशांतून त्याने मोठे साम्राज्य उभं केलं असल्याचे तक्रारदार सांगत आहेत.
त्याच्याकडे आलिशान कार आहे. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी प्लाॅटसुद्धा त्याच्या नावावर आहेत. लोकांना इंप्रेस करण्यासाठी गळाभर सोनं घालून तो मिरवत असतो. तो श्रीमंत्र असल्याचा आव आणून लोकांसमोर येत असल्याने नक्कीच तो पैशांचा पाऊस पाडत असणार, असा विश्वास लोकांचा बसत होता. त्यामुळेच त्याच्या भूलथापांना बळी पडून अनेकांनी त्याच्याकडे पैसे गुंतविल्याचे बोलले जात आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हसवड पोलिसांनी तातडीने हालचाली करून त्याला पकडणे गरजेचे आहे. त्याने आणखी कोणा-कोणाला अशा प्रकारे गंडा घातला, हे तेव्हाच समोर येईल. त्यातून त्याने नेमकी कोठे संपत्ती खरेदी केली. याचीही माहिती उघड होईल. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट असण्याचा संशय अंधश्रद्धा निर्मूलनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे.
अनेक तक्रारदार बघ्याच्या भूमिकेत..
भोंदू मांत्रिकाने अनेकांना गंडा घातला आहे. मात्र, समाजात आपली बदनामी होईल म्हणून कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. तर भोंदू मांत्रिकांकडूनही दमदाटी केली जात होती. या भीतीनेही अनेक तक्रारदार बघ्याच्या भूमिकेत आहेत.