सात वर्षांनी माणगंगा दुथडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 17:59 IST2017-10-12T17:51:50+5:302017-10-12T17:59:43+5:30

आटपाडीसह परिसरावर (मंगळवारी) रात्री पर्जन्यराजाने सुमारे पाच तास कृपा केली. त्यामुळे तब्बल सात वर्षांनी माणगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली.

Mangaanga Dothi after seven years | सात वर्षांनी माणगंगा दुथडी

आटपाडीसह परिसरावर मंगळवारी रात्री चांगला पाऊस झाल्याने सात वर्षांनी माणगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली.

ठळक मुद्देआटपाडी परिसरावर पर्जन्यराजाची कृपा पाच तास दमदार हजेरी रब्बी हंगामातील ज्वारीची शंभर टक्के क्षेत्रात पेरणीटेंभूह्ने टोलविले... निसर्गाने तारले..!

आटपाडी : आटपाडीसह परिसरावर (मंगळवारी) रात्री पर्जन्यराजाने सुमारे पाच तास कृपा केली. त्यामुळे तब्बल सात वर्षांनी माणगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली. या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारीची शंभर टक्के क्षेत्रात पेरणी होणार आहे. या पावसाने दिवाळीपूर्वीच तालुक्यातील बळीराजाला दिवाळीचा आनंद बहाल केला आहे.


जून महिन्यापासून कमी-अधिक प्रमाणात तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे; पण पावसाचे प्रमाण अल्प असल्याने ओढे आणि माणगंगा नदी कोरडी होती. फक्त डाळिंबाच्या बागांमध्ये सततच्या पावसाने गवत वाढले. डाळिंबावर वारंवार येणाऱ्या  भुरभूर पावसाने कीड-रोगांचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या पावसाची अपेक्षा होती.


मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने परिसरात सुरुवात केली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अधून-मधून थांबत सुमारे पाच तास पाऊस झाला. ओढ्यांना पाणी आले. विठलापूर परिसरात चांगला पाऊस झाल्याने ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहू लागले. दिघंची परिसरातही पावसाने जोर केल्याने माणगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली. सकाळी बोंबेवाडी येथील पुलापर्यंत पाणी आले होते. या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

२०१० नंतर प्रथमच माणगंगा ओली!

२००९-१० मध्ये तालुक्यात एकमेव नदी असलेल्या माणगंगेला पाणी आले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी तालुकावासीयांनी नदीतून पाणी वाहताना पाहिले. रात्री आटपाडी परिसरात ४० मिलिमीटर, तर दिघंची परिसरात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टेंभूह्ने टोलविले... निसर्गाने तारले..!

माणगंगा बारमाही करण्याच्या वल्गना गेली अनेक वर्षे करण्यात येत आहेत. टेंभूचे पाणी निंबवडे तलावात सोडून ओढ्यांने माणगंगा नदीत सोडावे, अशी मागणी होत आहे. त्यास यश आले नाही. पण आता पावसाने विठलापूर ओढ्यासह माणगंगा दुथडी भरून वाहू लागल्याने दिलासा मिळाला आहे.

Web Title: Mangaanga Dothi after seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.