Local Body Election Voting: मकरंद पाटील-अनिल सावंत यांचे कार्यकर्ते भिडले, वाईत मतदान प्रक्रियेला गालबोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:47 IST2025-12-03T20:46:20+5:302025-12-03T20:47:44+5:30
कडेकोट बंदोबस्त

Local Body Election Voting: मकरंद पाटील-अनिल सावंत यांचे कार्यकर्ते भिडले, वाईत मतदान प्रक्रियेला गालबोट
वाई : वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवार सकाळी मतदान पार पडले. यावेळी शांत आणि संयमी वाई नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत भांडणाने गालबोट लावले. द्रविड हायस्कूल व शाळा क्र. पाचच्या मतदान केंद्रावर मंत्री मकरंद पाटील व अनिल सावंत यांच्यासमोरच कार्यकर्त्यामध्ये भांडणाचा प्रसंग घडला.
काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्याने मतदारांचा हिरमोड झाला. सेंट थॉमस शाळेच्या मतदान मशीन्स दोन ते तीन वेळा बंद पडल्याने मतदान अतिशय शांततेत चालू होते. द्रविड हायस्कूल मतदान केंद्रावर मशीन्स अतिशय स्लो चालल्याने मतदानाला उशीर होत होता. पोलिसांना गंगापुरी व द्रविड हायस्कूल, मतदान केंद्रावर मतदारांना हाकलण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. सकाळी साडेसातपासून मतदान करण्यास प्रारंभ झाला.
वाई नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंदाजे ७२.९८ टक्के मतदान झाले. सकाळी अकरा वाजता २५ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीडपर्यंत ३६.३४ टक्के, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५३.२२ टक्के, तर साडेपाच वाजेपर्यंत ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. वाईच्या प्रांताधिकारी योगेश खैरमोडे, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी, मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी संजीवनी दळवी यांनी योग्य सूचना दिल्याने व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने काही अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
वाई शहरात ३४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष व २२ नगरसेवक उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद करण्यात आले. दि. २१ रोजी मतमोजणी असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी दिसून आली. वीस दिवस वाट पाहायला लागणार असल्याने प्रशासनावर मशीन्स सांभाळण्याचा ताण राहणार आहे.
दिव्यांगांसाठी व्हीलचेअर अन् पिण्याचे पाणी
वाई शहरात ३१ हजार ७६३ मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, तर पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी अनेक मतदान केंद्रांवर मंडप घालण्यात आला होता.
कडेकोट बंदोबस्त
उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, अमोल गवळी, पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक केंद्रावर किरकोळ तणाववगळता चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मंत्री मकरंद पाटील, प्रतापराव पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. नितीन सावंत, शिंदेसेनेचे यशराज भोसले, रवींद्र भिलारे, प्रतापराव भिलारे यांनी वाई शहरातील प्रत्येक बुथवर मतदान केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतला. मकरंद पाटील यांच्यासमोरच वादावादीचे प्रकार घडल्याने शांत वाईच्या निवडणुकीला गालबोट लागले.