साताऱ्यात हायव्होल्टेज ड्रामा! 'माझं अपहरण झालंच नव्हतं'; बापू शिंदेंच्या जबाबाने पोलिसांची गोची
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:07 IST2026-03-23T15:54:29+5:302026-03-23T16:07:30+5:30
बापू शिंदे यांचे अपहरण झाले असं सांगून शिंदे गटासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

साताऱ्यात हायव्होल्टेज ड्रामा! 'माझं अपहरण झालंच नव्हतं'; बापू शिंदेंच्या जबाबाने पोलिसांची गोची
Satara Zilha Parishad Clash: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी झालेल्या राड्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ज्या दिनकर उर्फ बापू शिंदे यांच्या अपहरणाच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतलं होतं, त्याच बापू शिंदे यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर होऊन माझं अपहरण झालंच नव्हतं असा खळबळजनक जबाब नोंदवला आहे. बापू शिंदे यांच्या या खुलाशामुळे सातारा पोलीस आता बॅकफूटवर आले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे सदस्य बापू शिंदे यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने दाखल केली होती. या तक्रारीचा आधार घेत पोलिसांनी जिल्हा परिषद सभागृहाच्या बाहेरच अजित पवार गटाचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला आणि मतदानापूर्वीच जिल्हा परिषदेमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
पालकमंत्र्यांना दुखापत अन् पोलीस अधीक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
या राड्यादरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार मकरंद पाटील यांना जोरदार धक्काबुक्की झाली. या गोंधळात पालकमंत्र्यांना धक्काबुक्की होऊन ते जखमी झाले. हे प्रकरण एवढे तापले की विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेशच सरकारला दिले होते. मात्र, आता बापू शिंदे यांच्या जबाबाने संपूर्ण चित्रच पालटले आहे.
बापू शिंदे यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात जबाब नोंदवल्यानंतर माध्यमांशी बोलताना बापू शिंदे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन जबाब दिला आहे.
"तुरुंगातील व्यक्तीलाही मतदानाचा अधिकार असतो, मग पोलिसांनी सदस्यांना मतदानापासून का रोखलं? माझं अपहरण झालं नव्हतं. आम्ही सर्वजण एकत्रच होतो. पोलिसांनी मतदानाच्या दिवशी जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. मी मतदानापूर्वीच ओरडून सांगत होतो की माझं अपहरण झालेलं नाही, पण पोलिसांनी कुणाचंच ऐकलं नाही." पण त्या दिवशी मतदानाला आलेल्यांचे पोलिसांनी अपहरण केले. माझं अपहरण झालं नव्हतं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी डांबून ठेवले हे साफ चुकीचे आहे. तिथे आम्ही एकत्रित होतो," असं स्पष्टीकरण बापू शिंदे यांनी दिले.
मुलाने तक्रार का दिली? दबावाचा संशय!
स्वतःच्या मुलानेच अपहरणाची तक्रार का दिली? या प्रश्नावर बोलताना शिंदे यांनी सूचक विधान केले. "मुलाने अपहरण झाल्याची तक्रार का दिली या विषयी मी काही सांगू शकत नाही. मुलाने गुन्हा दाखल केला असला तरी माझं अपहरण झालंच नाही असा जबाब मी दिला आहे. माझ्या मुलावर दबाव आणला गेला असावा. पण अजून त्याची भेट झाली नाही. भेटीनंतर खरी वस्तुस्थिती लक्षात येईल," असं बापू शिंदे यांनी सांगितले.