Satara: मलकापुरात महामार्गावर दिवसभर वाहतुकीचा कोंडमारा!, वाहनधारकांमधून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:02 IST2026-03-23T14:02:11+5:302026-03-23T14:02:35+5:30
सुमारे दीड ते दोन तास वाहतूक कोंडी, कोल्हापूर नाक्यावर रस्ता अरुंद त्यातच यात्रांच्या वाहनांची भरती

Satara: मलकापुरात महामार्गावर दिवसभर वाहतुकीचा कोंडमारा!, वाहनधारकांमधून संताप
मलकापूर : महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर कोल्हापूर नाका परिसरात रस्ता अरूंद त्यातच वाहनांची गर्दी होत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना सुमारे दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे मलकापुरात महामार्गावर वाहतुकीचा कोंडमारा होऊन सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या सहापदरीकरणाच्या कामामुळे अचानक बदल करून काही ठिकाणी कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आलेली आहे. खड्डेयुक्त मार्गातून मार्ग काढताना महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू असते.
कोल्हापूर नाका ते कोयना नदी पुलापर्यंत भराव पुलाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. याच परिसरात बस व प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
त्यातच विविध गावांच्या यात्रा सुरू झाल्यामुळे यात्रेसाठी बाहेर पडलेल्या वाहनांची महामार्गावर गर्दी होत आहे. या कोंडीमुळे दहा मिनिटांच्या अंतराला सुमारे तास लागत होता. रविवार असल्यामुळे मुंबई-पुणेकडे जाणारी वाहने वाढल्याने या लेनवर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मलकापूरकरांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही नेहमीचीच वाहतूक कोंडी स्थानिक नागरिकांची डोकेदुखी बनत आहे. ठिकठिकाणी दिवसभर वाहतूक पोलिसांनी मदत करावी, अशी मागणी वाहनधारक करत आहेत.