Satara: सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:37 IST2024-12-13T12:36:33+5:302024-12-13T12:37:11+5:30

पत्नीचा वाढदिवस अन् पतीवर अंत्यसंस्कार

Mahendra Jadhav of Tarle taluka Patan who was working as an Assistant Sub-Inspector of Police in the Mumbai Police Force, died of a heart attack during training | Satara: सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराने निधन

Satara: सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराने निधन

कऱ्हाड/पाटण : मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले तारळे (ता. पाटण) येथील महेंद्र दत्तात्रय जाधव यांचे पोलिस प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी तारळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मूळचे पाटण तालुक्यातील तारळे गावचे रहिवासी असलेले महेंद्र जाधव हे १९९० मध्ये पोलिस दलात रुजू झाले होते. हवालदार या पदावर काम करत असताना त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली होती. बुधवारी सकाळी नायगाव येथे पोलिस प्रशिक्षण सुरू असताना त्यांना चक्कर आली. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. गुरुवारी सकाळी तारळी नदीच्या काठावर उंब्रज पोलिस ठाण्याच्या वतीने मानवंदना देऊन त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसी परंपरा जपणारे कुटुंब..

देशसेवेचा ध्यास घेऊन त्यांचे वडील दत्तात्रय जाधव हेही पोलीस दलात सेवा बजावून २००० मध्ये सेवानिवृत्त झाले होते. तर तत्पूर्वीच त्यांनी मुलगा महेंद्र यास पोलिस दलात रुजू केले होते. एक प्रकारे तारळे येथील जाधव कुटुंबीय देशसेवेचा ध्यास घेतलेले कुटुंबच ठरले होते.

पत्नीचा वाढदिवस अन् पतीवर अंत्यसंस्कार..

गेल्या आठवड्यात महेंद्र व त्यांच्या पत्नी नीता यांच्या लग्नाचा वाढदिवस जाधव कुटुंबीयांनी मोठ्या थाटात साजरा केला होता. तर गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी पत्नी नीता यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन पतीने केले होते. मात्र, वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी महेंद्र जाधव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशीच महेंद्र जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ जाधव कुटुंबीयावर आली.

Web Title: Mahendra Jadhav of Tarle taluka Patan who was working as an Assistant Sub-Inspector of Police in the Mumbai Police Force, died of a heart attack during training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.