घडतंय-बिघडतंय: ‘घोडं’ अडलंय; पण कोण बसणार !; सातारच्या पालकमंत्रिपदाची चौघांनाही आस
By प्रमोद सुकरे | Updated: December 27, 2024 13:05 IST2024-12-27T13:04:29+5:302024-12-27T13:05:52+5:30
प्रमोद सुकरे कऱ्हाड : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे ...

घडतंय-बिघडतंय: ‘घोडं’ अडलंय; पण कोण बसणार !; सातारच्या पालकमंत्रिपदाची चौघांनाही आस
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे सगळीकडे उत्साह दिसतोय; पण पालकमंत्री कोण? याचं ‘घोडं’ अजूनही अडलंय. खरंतर ही माळ आपल्याच गळ्यात पडावी, अशी चौघांचीही इच्छा आहे; पण बोलून कोणच दाखवत नाही. सगळेच वरिष्ठांकडे बोट करत आहेत. पण पालकमंत्री पदाच्या घोड्यावर नक्की कोण बसणार? याबाबत जिल्हावासीयांमध्ये उत्सुकता लागून आहे.
खरंतर राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला खूप मोठे यश मिळाले. तरी देखील मुख्यमंत्रिपदाचे गुऱ्हाळ अनेक दिवस सुरू राहिले. तेव्हा कोठे १३ दिवसांनी सत्तास्थापनेचे बारशे झाले. त्यानंतर विना मंत्रिमंडळाचेच नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडले. तेव्हा शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता मंत्री वाजत गाजत आपापल्या मतदारसंघात फिरत आहेत; पण आता पालकमंत्री कोण याच्यात अनेकांचा जीव अडकलेला दिसतोय.
सातारा जिल्ह्यात यावेळी महायुतीने आठही मतदारसंघांत बाजी मारली आहे. वरिष्ठांनीही ८ पैकी ४ आमदारांना कॅबिनेट मंत्री करून नवा इतिहास रचला आहे. आता मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्याने चौघांच्याही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी साताराच्या पालकमंत्रिपदाची माळही आपल्याच गळ्यात पडावी, अशी आशा त्यांना लागून राहिली आहे.
सातारा हा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळावी, असे प्रत्येक नेत्याला वाटते. साहजिकच मंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद पाटील या चौघांनाही तसे वाटले तर नवल नाही; पण आता संधी एकालाच मिळणार असल्याने धाकधूक वाढली आहे एवढेच !
उदयनराजेंनी केलीय गोची !
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारचे पालकमंत्रिपद शिवेंद्रराजे भोसले यांनाच मिळावे, अशी थेट मागणी केल्याने इतर तिघांची चांगलीच गोची झाली आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी त्यांची परिस्थिती मानली जात आहे.
भाजपचाच पालकमंत्री !
जिल्ह्यात आठ पैकी चार आमदार हे भाजपचे निवडून आले आहेत. यापैकी शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे हे दोघे कॅबिनेटमंत्री आहेत. संख्याबळाचा विचार करता पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण आता दोघांपैकी नक्की संधी कोणाला मिळणार? याची चर्चा तर होणारच !
मकरंद पाटील घोड्यावर !
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांचे तर त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात घोड्यावर बसून स्वागत केले आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पालकमंत्रीपदासाठी दावा करणार. त्यामुळे यातून तिन्ही पक्ष कसा मार्ग काढणार, हे पाहावे लागणार आहे.
अनुभवाचा विचार होणार का?
सातारा जिल्ह्यातील सध्याच्या चार कॅबिनेट मंत्र्यांपैकी तीन मंत्री नवखे आहेत. फक्त शंभूराज देसाई यांनी यापूर्वी मंत्रिपद आणि सातारचे पालकमंत्रिपदही भूषवले आहे. त्यामुळे सातारचा पालकमंत्री निवडताना अनुभवाचा विचार होणार का? याचीही चर्चा होत आहे.
अडीच वर्षांचा फॉर्म्यूला होणार?
पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावे, यासाठीही सुप्त रस्सीखेच सुरू आहे. भाजपमधील दोन्ही मंत्र्यांना आणि त्याचबरोबर महायुतीतील इतर दोन मंत्र्यांनाही पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, असे वाटत आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवला जाणार का? याकडेही साऱ्यांच्या नजरा आहेत बरं.